मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्रात सर्वच्या सर्व 48 जागा येऊ शकतात, असा विश्वास प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला. 23 मेनंतर एनडीएला बहुमत मिळण्याची शक्यता कमी असल्याचंही आंबेडकर म्हणाले. लोकसभा निवडणुकांच्या आदल्या दिवशी प्रकाश आंबेडकर यांनी 'एबीपी माझा'शी खास बातचित केली.


अटल बिहारी वाजपेयी यांच्या वेळीप्रमाणे राष्ट्रपती भाजपला बोलावतील, पण बहुमत सिद्ध करणं कठीण आहे. राष्ट्रपती कमजोर आहेत.
त्यामुळे बिगर भाजप-बिगर काँग्रेस सरकार येईल. विरोधक एकत्र राहतील का, ही त्याची परीक्षा आहे. ते एकत्र राहिले, तर एनडीएला कठीण जाईल, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

VIDEO | नरेंद्र मोदी दहशतवादी संघटनेचे सदस्य : प्रकाश आंबेडकर | कोल्हापूर


काँग्रेस फुटण्याची शक्यताही प्रकाश आंबेडकरांनी यावेळी बोलून दाखवली. निवडणुकीनंतर आम्ही सेक्युलर पक्षांबरोबर राहू. केसीआर आणि देवेगौडा हे नेतृत्व करण्याची शक्यता असल्याचं ते म्हणाले.

उत्तर प्रदेशमध्ये 40 जागांवर भाजपला फटका बसेल. पश्चिम बंगाल मध्ये भाजप एक आकडी जागांवर येईल, अशी खात्री प्रकाश आंबेडकरांना वाटते. एक्झिट पोलवर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला.

ईव्हीएम हॅक होऊ शकतात, मी ते नाकारत नाही. मात्र आमच्या 48 जागा येऊ शकतात, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. प्रकाश आंबेडकर हे अकोला आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरले आहेत.