मुंबई : मानवी मूत्राच्या माध्यमातून युरिआ तयार केल्यास शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो, असं सांगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तालुका पातळीवर युरिन बँकेची स्थापना करण्यास सुचवलं आहे. एक लिटर मूत्रामागे एक रुपया द्यावा आणि युरिनपासून युरिआ तयार करावा, अशी अभिनव संकल्पना गडकरींनी बोलून दाखवली.
शेतकऱ्यांना खत म्हणून युरिआ दिल्यास फायदाच होईल. त्याचप्रमाणे युरिआची आयातही कमी होईल, असं गडकरींना वाटतं. 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत गडकरींनी ही संकल्पना सांगितली. स्वीडनच्या काही वैज्ञानिकांशी बोलणी सुरु असून हा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
मानवी मूत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर नायट्रोजन असतं, मात्र ते वाया जातं. टाकाऊतून टिकाऊ गोष्टींची निर्मिती करणं, हे माझं पॅशन आहे. फॉस्फरस आणि पोटॅशिअम यासारखे सेंद्रीय पर्याय उपलब्ध आहेतच. त्यात नायट्रोजनची भर टाकल्यास रोपांच्या वाढीसाठी आवश्यक पोषकद्रव्यं मिळतील, असा विश्वास गडकरींना वाटतो.
युरिनपासून युरिआ कसं तयार करणार?
ही योजना लागू झाल्यास शेतकऱ्यांना 10 लिटरच्या प्लास्टिक कॅनमध्ये यूरिन एकत्र करावी लागेल. हा कॅन सरकारकडून उपलब्ध करुन दिला जाईल. हा कॅन तालुका केंद्रावर पोहचता करावा लागेल. प्रत्येक लिटर युरिनमागे शेतकऱ्यांना एक रुपया मिळेल. गावांमधून ही योजना राबवण्यास सुरुवात करता येईल.
कॅनमध्ये एकत्र केलेली यूरिन डीस्टिल करुन शुद्ध करण्यात येईल. त्यानंतर सेंद्रीय खत म्हणून वापर करता येईल.