पुणे: हॉटेलमध्ये सर्व्हिस चार्ज अर्थात सेवा शुल्क देण्यास नकार देणाऱ्या आयटी कर्मचाऱ्याला शिवीगाळ करण्यात आली. पुण्यातील ‘1BHK सुपरबार’ या हॉटेल मालकांनी ग्राहकाला शिवीगाळ तर केलीच, पण झोमॅटोच्या वेबसाईटवर नकारात्मक रिव्ह्यू लिहिणाऱ्या मैत्रिणीच्या नंबरसाठी तगादाही लावल्याचा आरोप आहे.
तर आपणच पीडित असून, चतु:श्रुंगी पोलीस स्थानकात तक्रार केली आहे, असा दावा हॉटेल मालकाने केला आहे.
काय आहे प्रकरण?
अखिल सिंह हे शनिवारी मित्रांसह बाणेरमधील ‘1BHK सुपरबार’ या हॉटेलमध्ये गेले होते. बिल आल्यानंतर त्यातील सर्व्हिस चार्ज देण्यास अखिल सिंह यांनी नकार दिला.
हॉटेल व्यवस्थापनाने मग त्यांना बिलावर 10 टक्के सूट देऊ केली. पण अखिल सिंह यांनी ती सूट नाकारलीच, शिवाय त्यांनी सर्व्हिस चार्ज रद्द करण्याची मागणी केली.
यादरम्यान अखिल सिंह यांच्यासोबत आलेल्या मैत्रिणीने हॉटेल्सची माहिती देणाऱ्या झोमॅटो या वेबसाईटवर ‘1BHK सुपरबार’चा नकारात्मक रिव्ह्यू लिहिला. शिवाय हॉटेलमध्ये जे घडलं त्याबाबत सविस्तर लिहिलं.
संबंधित बातमी : हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये टीप देऊ नका, कारण...
त्याचवेळी अखिल सिंह यांना ‘1BHK सुपरबार’चे मालक रजत ग्रोव्हर यांचा फोन आला. ग्रोव्हर फोनवरुन सिंह यांच्या मैत्रिणीचा नंबर मागत होते. मात्र नंबर देण्यास नकार दिल्यानंतर, ग्रोव्हर यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप अखिल सिंह यांनी केला आहे.
“सर्व्हिस चार्ज देणं बंधनकारक नाही त्यामुळे आम्ही तो देण्यास नकार दिला. मात्र या हॉटेलकडून सातत्याने तो आमच्यावर लादण्याचा प्रयत्न करण्यात आला. आम्हाला बिलावर डिस्काऊंटची गरज नव्हती, आम्ही त्याबाबतच हॉटेल मालकांना सांगत होतो, मात्र त्यांनी आरडाओरड सुरु केली. तसंच ते सतत माझ्या मैत्रिणीचा नंबर मागत होते. मी नंबर देण्यास नकार दिल्याने त्यांनी शिवीगाळ करत, माझ्यावर दमदाटी केली. मला फोनवरुन शिवीगाळ, धमकीचे मेसेज येऊ लागले. हा प्रकार वाढत चालल्यामुळे मी हा प्रकार सोशल साईट्सवर लिहिला. मात्र मला तिथेही ग्रोव्हर धमकावू लागले”, असं अखिल सिंह यांचं म्हणणं आहे.
रजत ग्रोव्हर यांची पोलिसांत तक्रार
दरम्यान, रजत ग्रोव्हर यांनी आपणच पीडित असून, चतु:श्रुंगी पोलीस स्थानकात तक्रार केली आहे. तसंच झोमॅटोशीही संपर्क साधून रिव्ह्यूबाबत पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे, असं म्हटलं आहे.
“आम्ही सर्व्हिस चार्ज लावतो, अशी सूचना दिलेली आहे. अखिल सिंह त्यांच्या मैत्रिणीसोबत हॉटेलमध्ये आले. त्यावेळी त्यांनी आपण आयकर सहआयुक्त, तर मैत्रिण वकील असल्याचं सांगितलं.
या दोघांनी सर्व्हिस चार्ज देणं नाकारलं, तेव्हा त्यांना डिस्काऊंट देण्यात आला. ते बिल त्यांनी भरलं आणि निघून गेले. मात्र त्यांच्या मैत्रिणीने ‘झोमॅटो’वर नकारात्मक रिव्ह्यू लिहिल्याचं मला दुसऱ्या दिवशी समजलं. त्यामध्ये तिने बिलामध्ये सर्व्हिस चार्ज लावल्याचं लिहिलं होतं.
याबाबतच विचारण्यासाठी मी झोमॅटोकडून सिंह यांचा नंबर मिळवला आणि त्यांना कॉल केला. त्यांना त्यांच्या मैत्रिणीचा नंबर मागितला, पण त्यांनी दिला नाही. त्यांनी फोन ठेवून दिला, मात्र आमचं SMS वर मोठं संभाषण झालं. मी अधिक माहिती घेतली असता, अखिल सिंह हे आयकर अधिकारी नाहीत तर आयटी व्यावसायिक असल्याचं समजलं.
मी त्यांना तसा मेसेज केला. मात्र झोमॅटो आणि रेडईडीटवर नकारात्मक रिव्ह्यू सुरुच होते. एकाच वेळी दिल्ली, बंगळुरु आणि कॅलिफोर्नियातून रिव्ह्यू येत होते. जे शनिवारी हॉटेलमध्ये आले ते लगेचच या ठिकाणी कसे पोहोचले? शिवाय अशा साईट्सवर माझं प्रोफाईल नाही, तरीही माझ्या नावे कमेंट जात होत्या. त्यामुळेच मी पोलिसांकडे तक्रार केली आहे”, असं ग्रोव्हर यांनी सांगितलं.
प्रकरण मिटवा - सिंह
दरम्यान, या प्रकरणावर पडदा पडू दे असं आता अखिल सिंह यांचं म्हणणं आहे. तसंच मी आयकर अधिकारी आहे अशी ओळख करुन देणं हे अर्धसत्य होतं. मी सेवेत होतो, मात्र गेल्या वर्षी मी स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठी नोकरी सोडली. हे प्रकरण आता इथेच थांबायला हवं, असं सिंह म्हणाले.
दरम्यान, चतु:श्रुंगी पोलिसांत ग्रोव्हर यांच्याकडून कोणतीही तक्रार आलेली नाही, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं.
सर्व्हिस चार्ज म्हणजे काय?
हॉटेल तुम्हाला जी सेवा देतात, त्याच्या मोबदल्यात सर्व्हिस चार्ज वसूल केला जातो. सर्व्हिस चार्जची टीप म्हणून वसुली केली जाते. यासाठी कोणताही नियम किंवा मार्गदर्शक तत्व नाहीत. हा सर्व्हिस चार्ज 4 टक्क्यांपासून 20 टक्क्यांपर्यंतही असू शकतो. काही रेस्टॉरंट असं समजतात की, त्यांच्या इथे टीप देणं आवश्यक आहे. त्यामुळे ते हा चार्ज वसूल करतात. मात्र सरकारच्या तिजोरीत फक्त सर्व्हिस टॅक्स आणि व्हॅट जमा होतो.
सर्व्हिस टॅक्स म्हणजे काय?
सर्व्हिस टॅक्स सरकारकडून लावण्यात येतो. हा सर्व्हिस चार्जपेक्षा वेगळा आहे. हा टॅक्स सरकारच्या तिजोरीत जमा होतो.
संबंधित बातम्या
हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये टीप देऊ नका, कारण...