नागपूर : आज बालदिन...अर्थात पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती. लहान मुलांमध्ये रमणं, त्यांच्याशी गप्पा करणं पंडित नेहरुंचा आवडीचा विषय होता. त्यामुळे कालांतराने पंडित नेहरुंची जयंतीलाच बालदिन अशी ओळख मिळाली.

याच बालदिनानिमित्त आम्ही केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची मुलाखत तुम्हाला दाखवणार आहोत. मात्र, नेहमीचेच प्रश्न , नेहमीचे विषय असं या मुलाखतीत काहीही नसणार आहे. कारण, कुठल्या पत्रकाराने नव्हे तर गडकरींच्या नातीनेच गडकरींची ही मुलाखत घेतली आहे.

नितीन गडकरी यांची नात नंदिनीने विविध विषयांवरचे निरागस प्रश्न विचारुन गुगली टाकली. त्यावर गडकरींनी त्यांचे अनुभव, काही गोष्टी सांगितल्या. पाहूया या गोड मुलाखतीमधील किस्से...

नंदिनीचे प्रश्न आणि गडकरींची उत्तरं?

प्रश्न : आबा तुम्हाला कोणाच्या हातच्या पुडाच्या वड्या आवडतात?
उत्तर : मला आजीच्या हातच्या पुडाच्या वड्या आवडतात. आत्याने बनवलेलं फ्रूट सॅलड आवडतं.

प्रश्न : शाळेत कोणता विषय आवडायचा?
उत्तर : मराठी विषय आवडायचा. मला इतिहासाचे धडे आवडायचे. लोकमान्य टिळक, सावरकर, शिवाजी महाराज यांचे धडे वाचायचो.

प्रश्न : तुमच्या प्रिन्सिपलचं नाव काय होतं?
उत्तर : शाळेतल्या प्रिन्सिपलचं नाव बोडखे सर होतं, मग जोगळेकर मॅडम प्रिन्सिपन बनल्या.

प्रश्न : मोदी तुमचे प्रिन्सिपल आहेत का?
उत्तर : नाही, ते पंतप्रधान आहेत.

प्रश्न : मंत्री बनण्याचं आधीच ठरवलं होतं का?
उत्तर : बिलकुल नाही. मी क्रिकेट खेळायचो. बारावी पास झाल्यावर विद्यार्थी परिषदेत काम करु लागलो. मग इथे आलो. मंत्री बनेन असं मला कधीच वाटलं नव्हतं.

www.abpmajha.in

प्रश्न : तुम्हाला रस्ता बनवता येतं हे कसं कळलं, तो कसा बनवतात आणि तो कुठपर्यंत जातो हे कसं कळलं?
उत्तर : मला नाही कळत रस्ता कसा बनवतात. महाराष्ट्रात मंत्री झाल्यावर मला ते खातं मिळालं. मुंडे साहेबांनी मला ती जबाबदारी दिली. म्हणून मी ते खातं सांभाळलं. रस्ते बनवता बनवता दिल्लीत गेलो. तिथेही तेच खातं मिळालं. त्यात चांगलं काम करता आलं.

प्रश्न : तुम्ही इलेक्ट्रिक बोट कशी बनवली?
उत्तर : बोट नाही ती बस आहे. तिला अॅम्फिबियस बस म्हणतात. ती रस्त्यावर आणि पाण्यावर चालते. आता अॅम्फिबियस विमान आणायचंय. ते रस्त्यावर आणि पाण्यावरही चालेल.

प्रश्न : आबा तुम्हाला कोणतं गाणं आवडतं?
उत्तर : "तुझसे नाराज नहीं जिंदगी", "जिंदगी कैसी है पहेली" ही गाणी आवडतात. तसंच गझल, मराठीही आवडतात. "या जन्मावर या जगण्यावर" ही गाणीही आवडतात.

प्रश्न : तुम्हाला कोणाची गाणी आवडतात?
उत्तर : अरुण दाते, श्रीधर फडके, लता मंगेशकर, आशा भोसले यांची गाणी आवडतात. अरिजीत सिंहची गाणीही आवडतात.

पाहा व्हिडीओ