मुंबई : केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी पुन्हा एकदा आपली विकासाची रुपरेषा मांडली. देशाच्या विकासात कृषी आणि ग्रामीण क्षेत्राचा विकास किती महत्त्वाचा आहे हे सांगताना त्यांनी कोल्हापूरच्या (Kolhapur) श्रीमंतीचं उदाहरण दिलं.  मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी कोल्हापूरचं दरडोई उत्पन्न देशात सर्वाधिक (GDP) का आहे, याचं कारण गडकरींनी उदाहरणासह सांगितलं. 


नितीन गडकरी म्हणाले, "कृषी आणि ग्रामीण भागात सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकास झालेला नाही. त्यामुळे देशाच्या एकूण विकासाचं उद्दिष्ट गाठण्यात अपयश येत आहे.  कृषी आणि ग्रामीण भागात आर्थिक मागासलेपण आहे, तेच देशाच्या समस्येचं सर्वात मोठं कारण आहे. ते दूर करण्यामागे सहकाराची भूमिका कशी यशस्वी झाली, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे, विशेषत: कोल्हापूरचा उल्लेख करावा लागेल".  


म्हणून कोल्हापूरचा जीडीपी सर्वाधिक


देशात सर्वाधिक दरडोई उत्पन्न आणि शेती विकास दर यावर्षीचा मला माहिती नाही, पण तो कोल्हापूरचा आहे. त्याचं कारण म्हणजे त्या जिल्ह्यात सहकारी साखर कारखान्यांनी उत्पन्नाचं, नफ्याचं आणि शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचा उच्चांक गाठला, त्यामुळे त्या जिल्ह्यात जीडीपी आणि विकासदर वाढला असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.  


ज्या ठिकाणी खरेदीशक्ती वाढते, त्या ठिकाणी अर्थव्यवस्था वेग पकडते, त्यामुळे कृषी आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी सहकाराचं जाळं महत्त्वाचं आहे असं गडकरींनी सांगितलं.  


गावात पाणी पोहोचलं की नाही? 


दरम्यान, याच कार्यक्रमात नितीन गडकरींनी कोणत्या गावात पाणी पोहोचलंय आणि कोणत्या गावात नाही हे कसं ओळखायचं याबाबतचाही एक किस्सा सांगितला. गडकरी म्हणाले, मी एकदा कराडवरुन सोलापूरला जात होतो. सांगली-सोलापूरच्या दुष्काळी पट्ट्यातून जाताना, गाडीत असलेल्या अधिकाऱ्याला मी गावात न जाता त्या गावात पाणी पोहोचलंय की नाही ते सांगत होतो. त्यावर त्या अधिकाऱ्याने मला विचारलं, तुम्ही कसं काय ओळखलंत? तर मी त्यांना सांगितलं, ज्या गावात पाणी आहे, त्या गावातील दुकानं, हॉटेलमध्ये रेलचेल दिसतेय. ज्या गावात पाणी नाही तिथे दुकानं, हॉटेल रिकामी दिसतात, रेलचेल दिसत नाही" 


राज्य सहकारी बँकेला 110 वर्षे पूर्ण  


महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला 110 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं मुंबईत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  उपस्थित होते. याशिवाय राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, खासदार सुप्रिया सुळे, नीलम गोऱ्हे आदी मान्यवर उपस्थित होते.


 



महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha