मुंबई : नपुसंक, थंड माणूस, आयक्रीम कोन, कार्टा, कुत्री, पालतू कुत्रे..., ही भाषा आहे भाजपचे नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांची. ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांच्या घसरलेल्या भाषेला उत्तर देताना त्याहूनही खालच्या भाषेत नितेश राणेंनी आज काही वक्तव्यं केली, तीही पत्रकार परिषद घेऊन. नितेश राणे हे सध्या भाजपचे नेते असून त्यांचे वडील नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत. मग एक सभ्य, सुसंस्कृत राजकारणी अशी ओळख असलेले, राज्यातील भाजपचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadanvis) नितेश राणेंची ही भाषा चालणार आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय.
भाजपमध्ये या आधी अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारखे सुसंकृत नेते होऊन गेले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वैचारिक पाठबळ असलेल्या भाजपमध्ये असे अनेक नेते होऊन गेले आणि आताही आहेत, ज्यांनी कोणत्याही परिस्थितीत आपल्या वक्तव्याची पातळी कधीही सोडली नाही. आताचं उदाहरण घ्यायचं तर त्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव सर्वात वरती घ्यावं लागेल. या दोन्ही नेत्यांनी आपल्या राजकारणातील सभ्य वर्तनातून, भाषेतून एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. कुणावर टीका करताना त्यांनी कधीही तोल जाऊ दिला नाही.
देवेंद्र फडणवीस यांचं राज्यातील भाजप संघटनेवर एकहाती वर्चस्व आहे. फडणवीस म्हणतील ती पूर्व दिशा, ते म्हणतील तेच धोरण अशी काहीशी सध्याची स्थिती आहे. गेल्या निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतरही शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा केला आणि फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नांना तडा गेला. असं असलं तरी फडणवीसांची त्या काळातील सर्व वक्तव्यं तपासली, किंवा आतापर्यंतची भाषा तपासली तरी त्यामध्ये कुठेही त्यांनी आपल्या वक्तव्याची पातळी घसरू दिली नाही. त्यांच्या धाकानेच इतर भाजप नेतेही अश्लाघ्य भाषा वापरत नाहीत हेही खरंय.
...सुरुवात संजय राऊतांपासून
शिवराळ भाषा ही शिवसेनेची ओळख, पण या शिवराळ भाषेने कधी आपली पातळी सोडली हे लक्षात आलं नाही. शिवसेनेचे संजय राऊत यांनी अनेकवेळा, खासकरून किरीट सोमय्यांवर टीका करताना त्यांना थेट शिव्याच दिल्या. शिवराळ भाषेच्या नावाखाली ते जरी खपवत असले तरी राज्यातल्या नागरिकांना हे समजत होतं. आता ते भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन जरी तुरुंगात गेले असले तरी इतर नेत्यांनी त्यांची उणीव जराही भासू दिली नाही असंच दिसतंय. त्यामध्ये सर्वात पुढे येतात ते नितेश राणे आणि भास्कर जाधव. संजय राऊत यांची शिवराळ भाषा कायम ठेवताना भास्कर जाधव स्वत: घसरले, त्यांनी भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबाबत अश्लाघ्य भाषेचा वापर केला.
त्याला प्रत्युत्तर देताना नितेश राणे यांनी त्याहून खालची पातळी गाठली. नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर अतिशय दर्जाहीन आणि खालच्या भाषेत टीका केली. नपुंसक, आयस्क्रीम कोन, भटकी कुत्री, थंड माणूस... या एकाहून एक, सर्वसामान्यांना कुटुंबासोबत ऐकतानाही लाज वाटेल अशा भाषेचा वापर केला.
फडणवीसांचा धाक राहिला नाही का?
भाजप नेते नितेश राणे यांनी आज उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांच्याबद्दल जी भाषा वापरली ती पक्षाचे नेते म्हणून देवेंद्र फडणवीसांना मान्य आहे का? फडणवीस हे राणे भावंडांवर कारवाई करणार का? किमान त्यांना जाहिररित्या खडसावणार का? यातील काहीच त्यांनी केलं नाही तर नितेश राणे यांनी वापरलेली भाषा ही फडणवीसांना मान्य आहे असाच संदेश जाईल.
देवेंद्र फडणवीस समोर असतील तर भाजपच्या कोणा नेत्यांचं पुढे बोलण्याचं धाडस होत नाही, मग दर्जाहीन भाषा तर लांबचीच गोष्ट आहे. यातून त्यांचा पक्षातील नेत्यांवर असलेला नैतिक धाक दिसून येतोय. पण मग आता त्यांच्याच पक्षाच्या नेत्याने असं जाहीर पत्रकार परिषदेत विरोधकांबद्दल वापरलेली भाषा काय सांगते? भाजपच्या संस्कृतीला राणे अपवाद आहेत का? देवेंद्र फडणवीसांचा धाक कमी होतोय हे याचं निदर्शक आहे का?
काल-परवापर्यंत अंधेरीमधून भाजपने माघार घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा दाखला दिला जात होता. तेव्हा महाराष्ट्राची संस्कृती शाबूत आहे असंच वाटत होतं. पण आजच्या भास्कर जाधव आणि नितेश राणे यांचे एकमेकांविरोधातील वक्तव्य पाहिल्यास खरं काय आणि खोटं काय हेच लक्षात येत नाही.
काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजावर केलेल्या वक्तव्याबद्दल शरद पवार यांनी त्यांचे जाहिररित्या कान उपटले होते. माझ्या सहकाऱ्याने केलेली भाषा मला मान्य नाही असं त्यांनी सांगितलं होतं. आता शरद पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवत देवेंद्र फडणवीस भाजपच्या नेत्यांच्या अश्लाघ्य वक्तव्याला आळा घालणार का हे पाहावं लागेल.