मुंबई: गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाचे भास्कर जाधव आणि राणे कुटुंबीय यांच्यात वाग्युद्ध रंगल्याचं दिसून येतंय. आज कुडाळमधील सभेतून भास्कर जाधव यांनी राणे-पित्रापुत्रांवर टीकांचा भडिमार केला. त्यानंतर काही तासातच  प्रत्युत्तरादाखल नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत भास्कर जाधव आणि उद्धव ठाकरेंवर आगपाखड केली.


कोंबडी, माकडं, बेडुक, कुत्री, चरसी, सोंगाडे, नपुंसक.... असे एक ना अनेक शब्द आपल्याला ऐकायला मिळतात, तेही आपण ज्यांना निवडून दिलोय त्या राजकारण्यांकडून. काल परवापर्यंत अंधेरीमधून माघार घेताना महाराष्ट्राच्या संस्कृतीचा दाखला दिला जात होता. तेव्हा महाराष्ट्राची संस्कृती शाबूत आहे असं वाटत होतं. पण अवघ्या 24 तासात शिवसेना आणि भाजपच्या काही नेत्यांनी संस्कृती सोडा, विकृतीच ठासून भरली असल्याचं दाखवून दिलंय. त्याचं कारण आहे, राणे विरुद्ध जाधव विरुद्ध राणे वाद. 


भास्कर जाधवांची शेरेबाजी 


शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्यावर सुरु असलेल्या धाडीविरोधात शिवसेनेनं आज मोर्चा काढला होता. या मोर्चाला शिवसेना आमदार भास्कर जाधव आले. पण ते येण्याआधीच भाजप नेते निलेश राणे यांनी त्यांना शेलक्या शब्दात आव्हान दिलं. आता निलेश राणेंनी थेट भास्कर जाधवांना आव्हान दिल्यानंतर भास्कर जाधवही आज कुडाळमध्ये आले आणि त्यांनी निलेश राणेंवर अश्लाघ्य भाषेत शेरेबाजी केली. 


भास्कर जाधवांनी आपल्या भाषणात निलेश राणेंचा समाचार तर घेतलाच पण त्यांची जीभ नारायण राणेंच्या विरोधातही घसरली. जाधवांनी राणेंच्या वक्तृत्व शैलीवरही शेलक्या शब्दात समाचार घेतला. 


नितेश राणेंची जीभ घसरली 


आधी आपल्या भावाची, मग आपल्या वडिलांची इभ्रत अशी चव्हाट्यावर मांडल्यामुळे नितेश राणेही भडकले. मग त्यांनी भास्कर जाधवांच्या खालच्या पातळीच्या भाषेशी स्पर्धा सुरु केली. पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर नको त्या भाषेत टीका केली. आदित्य ठाकरेंच्या विरोधातही बोलतानाही नितेश राणेंची घसरली. शिवसेना ठाकरे गटाला मिळालेल्या मशाल चिन्हावरुन त्यानी आदित्य ठाकरेंच्यावर अश्लाघ्य आरोप केले.


नितेश राणेंनी भास्कर जाधवांच्या संस्कारांवरच सवाल विचारले. शिक्षकाचा मुलगा वात्रट निघेल असं वाटलं नव्हतं असं ते म्हणाले.  


आता दोन्ही बाजूने असं ताळतंत्र सुटल्यानं राज्यातल्या सर्वपक्षीय नेत्यांनी जरा बरं बोलण्याचा सल्ला दिला आहे. याआधी संजय राऊतांनी शिवराळ वक्तव्यांमध्ये पीएचडीच केली होती. पण ते तुरुंगात गेले. तरी त्यांची उणीव मात्र कुणीच भासू दिलेली नाही.  


गांधीजी म्हणायचे नेहमी खरे बोलावे. पण आता नेहमी बरे बोलावे हेही सांगण्याची वेळ आली आहे. अन्यथा विकृती पसरवणाऱ्या नेत्यांनी संस्कृतीच्या गप्पा तरी मारु नयेत.