नवी दिल्ली : जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील निशा पाटील या विद्यार्थिनीला राष्ट्रीय शौर्य बाल पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्या एका चिमुरडीला वाचवल्यामुळे तिचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला.
निशा पाटील ही भडगाव येथील आदर्श कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. काही दिवसांपूर्वीच तिची पुरस्कारासाठी निवड झाल्याचं पत्र शाळेला मिळालं होतं. निशा ही 12 वी वाणिज्य वर्गात शिक्षण घेत असून 14 जानेवारी 2016 रोजी अभ्यासाची वही मैत्रिणीकडून घेऊन घरी येताना शेजारच्या घरातून आगीचा धुर निघताना तिला दिसला.
घरातील व्यक्ती कामानिमित्त बाहेर गेलेले होते. 6 महिन्यांच्या बाळाची आई बाळाला झोक्यात बाहेर गेली होती. घराचा दरवाजा उघडून पाहिला तर लहान बाळाच्या झोक्याच्या दोरीला आग लागल्यामुळे ते बाळ जमिनीवर पडलेलं होतं. लाकडी, धाब्याचे घर असल्याने ते जळत होते. क्षणाचाही विलंब न करता निशाने घरात जाऊन बाळाला बाहेर काढले.
निशा ही अत्यंत गरीब कुटुंबातली मुलगी असून तिचे आईवडील मजुरी करुन पोट भरतात. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ती पहिल्यांदाच दिल्लीत आली आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला मिळणार याची उत्सुकता असल्याचं तिनं एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. देशातल्या एकूण 25 बालकांना वीरता पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.