सातारा: ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी वृक्षारोपण केलेल्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे. ही झाडं कुणी तोडली याचं कारण कळू शकलं नाही. माण तालुक्यातील पांढरवाडी इथं सयाजी शिंदे यांनी या झाडांची लागवड केली होती. गेल्या सहा महिन्यापासून झाडांना पाणी घालून जगवलं. मात्र काल अचानक कुणी तरी अज्ञातांनी या झाडांची कत्तल केली आहे.
विशेष म्हणजे सयाजी शिंदे यांनी नवीन वर्षाचं स्वागत या झाडांना पाणी घालून केलं होतं. शिवाय परिसरातल्या शाळेतील विद्यार्थ्यांनीही झाडं वाचविण्यासाठी मेहनत घेतली होती. मात्र अचानक आता या झाडांवर कुऱ्हाड चालवल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
नव्या वर्षाचं स्वागत करताना अभिनेते सयाजी शिंदे यांनी साताऱ्यात वृक्षारोपण केलं होतं.
सातारा जिल्ह्यातील दुष्काळी पट्यातील पांढरवाडी गावात सयाजी शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड केली होती. सयाजी शिंदे यानी या गावात जवळपास 25 हजाराहून अधिक झाडे लावली होती.
पांढरवाडी गावाला जाणाऱ्या रोडच्या दुतर्फा जवळपास 100हून अधिक झाडांवर अज्ञाताने कुऱ्हाडीचे घाव घालुन ती तोडल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या अशाप्रकारचे कृत्य करण्यांविरोधात ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.