पंढरपूर : कोरोनाचे भयावह संकट वाढू लागल्याने नीरा नरसिंहपूर येथील नरसिंह जयंतीचा उत्सव स्थगित करण्यात आला आहे. नरसिंह जयंती नवरात्र उत्सव 29 एप्रिल ते 7 मे या कालावधीमध्ये होणार होता. दरम्यान कोरोनामुळे नरसिंह जयंती नवरात्र उत्सव यावर्षी स्थगित करण्याचा निर्णय मंदिर समिती, पुजारी मंडळ, अन्नछत्र विश्वस्त मंडळ , सरपंच व ग्रामस्थ यांच्या बैठकीत घेण्यात आला.


नीरा नरसिंहपूर हे राज्यातील प्रमुख नरसिंह मंदिर असून देशभरातील लाखो भाविक या कालावधीत दर्शनाला येत असतात. पुणे आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेले हे पुरातन मंदिर नीरा व भीमेच्या संगमाजवळ आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हे कुलदैवत असून दरवर्षी ते कुटुंबासह दर्शनासाठी येत असतात.

कोरोनामुळे भाविकांसाठी हे मंदिर बंद असले तरी श्री नरसिंह जयंती नवरात्र उत्सव बंद मंदिरात होणार असून यावेळी कोणालाही मंदिरात प्रवेश मिळणार नाही. वैशाख शुद्ध षष्टी म्हणजेच 29एप्रिल रोजी श्रींचे नवरात्र प्रारंभ होणार असून वैशाख शुद्ध द्वादशी अर्थात 5 मे रोजी श्रींची चंदन उटी पूजा होणार आहे.

वैशाख शुद्ध चतुर्दशीला 6 मे रोजी श्री नरसिंह जयंती जन्मोत्सव सायंकाळी 6 वाजून 56 मिनिटांनी होणार आहे. वैशाख शुद्ध पौर्णिमा म्हणजेच 7  मे रोजी श्रींचे पारणे व छबिना असणार आहे.

या नवरात्र काळात फक्त धार्मिक विधी केले जातील. मात्र हे विधी सुरु असताना मंदिरात कोणालाही प्रवेश दिला जाणार नसून पुढील आदेश मिळेपर्यंत मंदिर बंद राहील असे आवाहन मंदिर समिती करण्यात आले आहे.