सिंधुदुर्ग : आधुनिकतेच्या युगात अनेक रूढी, प्रथा, परंपरा काळाच्या पडद्याआड जात आहेत. शॉर्टकट अवलंबताना रितीरिवाजाला बगल दिली जात आहे. थोडंसं मॉडर्नायझेशन झालेल्या गणेशोत्सवाला आता ग्लोबल स्वरूप प्राप्त होत आहे. सोशल मीडियाचा प्रभावी वापर या उत्सवात दिसून येत आहे. परंतु या सगळ्याचा सारासार विचार करता कितीही बदल झाले तरी हा उत्सव साजरा करण्याच्या कोकणातील परंपरा आजही टिकून आहेत. याच रूढी, परंपरा या आपल्या लाडक्या उत्सवाची वेगळी ओळख सांगत आहेत.




कोकणातील गणेशोत्सव हा  सर्व सणांचा शिरोबिंदू आहे. आजही जिल्ह्यात एकत्रितरीत्या साजरे होणारे अनेक घरगुती गणपती आहेत. देवगड तालुक्यातील मिठबाव येथील जेठे घराण्याच्या गणपतीची स्थापना जेठे कुलस्वामीनी मंदिरात केली जाते. एकंदर सव्वीस जेठे कुटुंबीयांचा मिळून एकाच गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. साधारणत: पाचशे वर्षापूर्वी या गणेशोत्सवास प्रारंभ झाल्याचे सांगण्यात येते.



पूर्वी या गणपतीच्या मूर्तीची निर्मिती गणपती प्रतिष्ठापनेच्या जागी ठोकळ्या पद्धतीने म्हणजेच साधारणत: सर्व आकार चौकोनी ठोकळ्यासारखे अशी केली जात असे. काळाच्या ओघात त्याचे स्वरूप बदलत जाऊन ती मूर्ती पाकळ्याच्या स्वरूपात बदलत गेली. संपूर्ण मूर्ती ही शाडू मातीपासून बनविली जाते. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे गणेश शिरावरील मुकुट 121 पाकळ्यांचा बनवला जातो. म्हणूनच हा गणपती पाकळ्यांचा गणपती म्हणून सुद्धा ओळखला जातो.



संपूर्ण हाती बनविली जाणारी ही मूर्ती पांढऱ्या आणि शेंदरी रंगात बनविली जाते. जेठे कुटुंबीयांच्या नऊ पिढ्यांचा इतिहासही या पाकळ्यांचा गणपतीशी जोडला गेला आहे.