मुंबई: भारतासारख्या देशात आध्यात्मिक गुरु आणि त्यांच्या आश्रमांचं मोठं प्रस्थ आहे. मात्र या अध्यात्मिक गुरुंनी आपल्या आश्रमांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपायंच्या संपत्तीचा डोलारा उभारला आहे. भारतातील निवडक 5 अध्यात्मिक गुरुंकडे किती संपत्ती आहे, त्यावर एक नजर. (माहिती स्त्रोत – इंटरनेट, गुगल, अध्यात्मिक गुरुंच्या वेबसाईट, विकिपिडीया)

  1. माता अमृतानंदमयी :


माता अमृतानंदमयी या हिंदू आध्यात्मिक शिक्षक आणि नेत्या आहेत. असंख्य अनुयायांनी त्यांना संत पद बहाल केलं आहे. अलिंगन देणारी संत म्हणूनही माता अमृतानंदमयी प्रसिद्ध आहेत.




दु:खी-कष्टी भक्तांना प्रेमाने जवळ घेऊन मायेचा हात देणं अशी त्यांची ख्याती आहे. त्यामुळेच जवळपास त्यांचे 3 कोटी अनुयायी आहेत.

माता अमृतानंदमयी यांच्यामार्फत ‘अमृतानंदमयी’ हा ट्रस्ट चालवला जातो. या ट्रस्टकडे 1500 कोटींची संपत्ती आहे. माता अमृतानंदमयी यांच्या नावे अनेक शाळा, महाविद्यालये आणि टीव्ही चॅनेल्स आहेत. हेच त्यांच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे.

2) योगगुरु बाबा रामदेव -

बाबा रामदेव हे योगगुरु म्हणून परिचीत आहेत. बाबा रामदेव हे योगा, नैसर्गिक औषधं, शेती उत्पादनं आणि स्वदेशीचा प्रचार-प्रसार करतात.

बाबा रामदेव हे गरीब कुटुंबात जन्माला आले. त्यांचे वडील हरियाणात शेतकरी होते. बाबा रामदेव यांनी 15 वर्ष खडतर आयुष्य जगून, त्यांनी हरिद्वारमधील लोकांना योगा शिकवण्यास सुरुवात केली.



त्यांना योग आणि योगासनाचं ज्ञान आहे. हेच ज्ञान आज त्यांची ओळख बनली आहे. याच योगाच्या माध्यमातून त्यांनी पतंजलीची स्थापना केली. पतंजली योगपीठ आणि दिव्य योगी मंदीर ट्रस्ट या माध्यमातून बाबा रामदेव यांच्याकडे 1100 कोटींची संपत्ती आहे.

3) श्री श्री रवीशंकर :

भारतातील प्रमुख आध्यात्मिक गुरुंपैकी एक नाव म्हणजे श्री श्री रवीशंकर होय. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रेणेते म्हणून त्यांची ओळख आहे. जगभरात त्यांचे अनुयायी आहेत.

श्री श्री यांचे जगातील सुमारे 151 देशात 30 कोटींपेक्षा जास्त अनुयायी आहेत. त्यांची वार्षिक उलाढाल 1 हजार कोटी रुपयांपर्यंतची आहे. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ हाच त्यांचा महत्त्वाचा उत्पन्नाचा स्त्रोत असल्याचं सांगण्यात येतं.



‘इंडिया टुडे’नुसार, तामीळनाडूत जन्मलेल्या रवीशंकर यांनी वैदिक शिक्षणाला सुरुवात केली. वयाच्या 17 व्या वर्षी त्यांनी वैदिक साहित्य आणि विज्ञान या विषयाचं शिक्षण पूर्ण केलं.

4) आसाराम बापू :

भारतीय आध्यात्मिक क्षेत्रात वादाने गाजलेलं नाव म्हणजे आसाराम बापू होय. स्वयंघोषित संत असलेले आसाराम बापू सध्या जेलमध्ये आहेत. आश्रमातील अवैध कारनाम्यांमुळे आसारामला जेलची हवा खावी लागत आहे.



आसाराम बापू ट्रस्टची वार्षिक उलाढाल 350 कोटींच्या घरात आहे. देशा-विदेशात आसाराम बापू ट्रस्टची 350 आश्रम आणि 17 हजार बालसंस्कार केंद्र आहेत.

5) गुरमीत राम रहीम सिंह :

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंह सध्या देशासह जगभरात चर्चेत आहे.  सातत्याने चर्चेत आणि वादात राहणं हे गुरमीत राम रहीमचं वैशिष्ट्य. बलुचिस्तानातील शाह मस्ताना यांनी 1948 मध्ये डेरा सच्चा सौदाची स्थापना केली. हरियाणातील सिरसा इथं आध्यात्मिक केंद्र म्हणून डेरा सच्चा सौदाचा आश्रम आहे. या आश्रमाची सिरसा इथं सुमारे 700 एकर शेतजमीन आहे. याशिवाय दवाखाने, जमिनी, इमारती अशी अनेक प्रॉपर्टी गुरमीत राम रहीमकडे आहे.



1967 मध्ये राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये जाट शिख कुटुंबात जन्मलेल्या बाबा राम रहीमला तत्कालीन डेरा प्रमुख सतनाम सिंह यांनी 23 सप्टेंबर 1990 मध्ये आपला वारसदार घोषित केलं. वयाच्या 23 व्या वर्षी बाबा राह रहीम डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बनला. यानंतर बाबा राम रहीम यांच्या नेतृत्त्वात डेरा सच्चा सौदाची लोकप्रियता वाढू लागली. बाबा राम रहीमचा डेरा सच्चा सौदा सामाजिक एकोपा, नशामुक्ती आणि मानवसेवेपासून सर्वधर्मसमभावचा संदेश देतात. डेरा सच्चा सौदाच्या अनुयायांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे.

मात्र डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीमला बलात्कार प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं आहे. 15 वर्षांपूर्वी साध्वीवरील बलात्कार प्रकरणात पंचकुला सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश जगदीप सिंह यांनी हा निकाल दिला.