चंद्रपुरात पावणेपाच फुटांचा पांढरा नाग आढळला!
एबीपी माझा वेब टीम | 28 Aug 2017 08:45 AM (IST)
जुनोना येथे पकडण्यात आलेला नाग हा अंदाजे पावणे पाच फूट असून पूर्णपणे तंदरुस्त आहे.
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातल्या जुनोना गावात अत्यंत दुर्मिळ पांढरा नाग म्हणजेच अल्बिनो कोब्रा (Albino Cobra) आढळला आहे. जुनोना हे गाव जंगलाला लागून असून शुक्रवारी रात्री विलास आलाम यांच्या घरी एक नाग दडून बसल्याचे दिसून आले. त्यांनी याच गावातील काही सर्पमित्रांना याची माहिती दिली. सर्पमित्रांनी हा नाग जेव्हा बाहेर काढण्यात आला, तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण हा नाग पांढऱ्या रंगाचा होता. विशेष म्हणजे हा नाग दुर्मिळ असण्यासोबतच दिसायला अतिशय सुंदर आणि पांढरा शुभ्र असतो. पांढरा नाग किंवा अल्बिनो कोब्रा ही वेगळी प्रजाती नसून नागाच्या डीएनएमध्ये बदल झाल्यामुळे नागाचा संपूर्ण रंग पांढरा दिसतो. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्यांदाच हा पांढरा नाग आढळला आहे. जुनोना येथे पकडण्यात आलेला नाग हा अंदाजे पावणे पाच फूट असून पूर्णपणे तंदरुस्त आहे. जुनोना येथील वनविभाग कार्यालयात या नागाची नोंद करण्यात आली असून त्याला जुनोना येथील त्याच्या प्राकृतिक अधिवासात मुक्त करण्यात आले आहे.