मुंबई: दुसऱ्यांना संपवण्याची भाषा करणारा जास्त काळ टिकत नाही, याचे एक दोन तालुक्यापुरतेच समर्थक उरले आहेत अशा शब्दात भाजपचे नेते माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी मनोज जरांगे पाटलांवर (Manoj Jarange) टीका केली आहे. मराठा तरुणांनी जरांगेंसोबत राहू नका, भविष्याचा विचार करा असंही त्यांनी आवाहन केलं आहे. निलेश राणे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मनोज जरांगे यांच्यावर टीका केली आहे. 


मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी भाजपचे नेते आणि राज्याचे उपख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सातत्याने टीका केली आहे. त्याचा फटका भाजपला लोकसभा निवडणुकीतही बसल्याचं दिसून आलं. नुकतंच मनोज जरांगे यांनी त्यांचं मराठा आरक्षणासाठीचं उपोषण स्थगित केलं आहे. त्यावरूनच आता माजी खासदार निलेश राणे यांनी त्यांच्यावर टीका केली. 


काय म्हणाले निलेश राणे? 


दुसऱ्यांना संपवायची भाषा करणारा स्वतःच जास्त काळ टिकत नाही जरांगे पाटील, एक-दोन तालुक्यांमध्ये स्वतःचे समर्थक असले म्हणजे राज्याचा नेता किंवा समाजाचा नेता होता येत नाही. 


काही मराठा समाजाच्या तरुणांना माझी विनंती आहे या माणसाबरोबर राहण्यात आता काही अर्थ नाही, आपल्या भविष्याचा विचार करा. किती वेळा हा माणूस आंदोलन स्थगित करणार आणि पुन्हा सुरू करणार आणि पुन्हा तुम्हाला जमिनीवर बसवणार??




जरांगेंवर राणे कुटुंबीयांकडून याआधीही टीका


या आधीही राणे कुटुंबीयांकडून मनोज जरांगे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी या आधीच सरसकट मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या जरांगेंच्या मागणीला विरोध केला आहे. मराठा आणि कुणबी वेगळे असून मराठा समाजातील लोक कोणत्याही परिस्थितीत कुणबी प्रमाणपत्र घेणार नाहीत असं नारायण राणे यांनी म्हटलं होतं. भाजपचे आमदार नितेश राणे यांनीदेखील या आधी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली आहे. 


मनोज जरांगेंचे आंदोलन स्थगित


मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटीत सुरू केलेले आमरण उपोषण स्थगित केले आहे. नारायणगडाचे मठाधिपती आणि गावातील महिलांच्याहस्ते ते उपोषण सोडलं आहे. ज्यूस पिऊन त्यांनी हे उपोषण सोडले असून तब्येत ढासळल्याने आमरण उपोषण स्थगित केल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांना गावकऱ्यांनी आणि समर्थकांनी उपोषण मागे घेण्याचा आग्रह धरला होता. दरम्यान, आज सकाळीच तब्येत ढासळल्याने मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेत असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना दिली होती.


ही बातमी वाचा: