मुंबई: पारनेरचे आमदार आणि अजित पवारांचे विश्वासू समजले जाणारे निलेश लंके  (Nilesh Lanke) यांनी त्यांची साथ सोडून शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. लंकेंनी घेतलेला हा निर्णय अजित पवार गटाला चांगलाच जिव्हारी लागल्याचं दिसतंय. त्यामुळेच की काय त्यांच्याकडून त्यांना भावनिक आवाहन केलं जात आहे. लंके साहेब, तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवली जातेय, दादांची साथ सोडू नका असं आवाहन आमदार अमोल मिटकरी यांनी केलंय. सोशल मीडियावर केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी आमदार रोहित पवारांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केल्याचं दिसतंय.


राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक ट्विट केलंय. त्यामध्ये ते म्हणतात की, "लंके साहेब तुमच्या खांद्यावर बंदुक ठेवली जातेय. दादांची साथ सोडू नका.तुम्हाला इतरांपेक्षा उज्वल राजकीय भविष्य आहे . तुतारी गटाला लोकसभा लढवायची एवढीच हौस असेल तर बालमित्र मंडळाच्या अध्यक्षाला मैदानात उतरवून बघा म्हणावं. तुम्ही एक सामान्य आहात म्हणुन विनंती."


 






तेव्हा अजितदादांनी पाठबळ देण्याचा प्रयत्न केला


त्या आधी माधमांशी संवाद साधताना अमोल मिटकरी यांनी लंके यांच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले की, आमदार निलेश लंके हे अजित पवारांना सोडून जात आहेत याचं स्वत: शरद पवार साहेबांनीच खंडन केलं आहे. आज किंवा उद्या त्यांच्या पक्षप्रवेशाचं कुठेही दिसत नाही. लोकसभेसाठी ते इच्छुक आहेत असं ऐकतोय. मात्र तेव्हा अजितदादांनी त्यांना मोठं पाठबळ देण्याचा प्रयत्न केला आहे. मला तरी असं वाटतेय लंके साहेब तिकडे जाणार नाहीत.  


रोहित पवार म्हणतातल लंकेंचं पक्षात स्वागत करू,आज त्यांना दुसरा काही कामधंदा उरला नाही. त्यांनी राष्ट्रीय नेता होण्याचा कधीही प्रयत्न करू नये अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी त्यांच्यावर टीका केली. इकडं अजितदादा अन् तिकडं पवारसाहेब समर्थ आहेत, त्यामुळं दोन मोठ्या माणसांमध्ये आपण आपलं तोंड न घालता ते शांत ठेवलेलं कधीही चांगलं असा सल्ला मिटकरींनी रोहित पवारांना दिला.


ही बातमी वाचा :