Ashutosh Gowariker : आज चित्रपटसृष्टीसाठी अधिकच आव्हानात्मक काळ आहे. प्रत्येक गोष्टीला हस्तक्षेप होत असून हे का केले? हे असेच का?  असे विचारले जात असल्याचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर (Ashutosh Gowariker) यांनी म्हटले. कुसुमाग्रज प्रतिष्ठान आयोजित गोदावरी गौरव समारंभ नाशिकच्या गुरुदक्षिणा सभागृहात रविवारी सायंकाळी पार पडला. त्यावेळी आशुतोष गोवारीकर यांनी म्हटले. 


आपल्या विशिष्ट क्षेत्रात असामान्य कामगिरी करून भारतीय समाजाचे सांस्कृतिक जीवन संपन्न करणाऱ्या महनीय व्यक्तींना, मराठी माणसांनी केलेला कृतज्ञतेचा नमस्कार म्हणून हा गौरव केला जातो. एक वर्षाआड दिला जाणारा हा मानाचा पुरस्कार यंदा लोकसेवासाठी मुस्लिम साहित्यिक डॉ. शमसुद्दिन तांबोळी यांना प्रदान करण्यात आला. तर,  ज्ञान-विवेक सावंत, शिल्प -प्रमोद कांबळे, नृत्य - डॉ. सुचेता भिडे-चाफेकर, चित्रपटासाठी आशुतोष  गोवारीकर तर क्रीडा क्षेत्रासाठी सुनंदन लेले यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या पुरस्कार विजेत्यांचा गौरव करण्यात आला. 


आपल्या भाषणात दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी म्हटले की, आज चित्रपटाचा आव्हानात्मक काळ आहे. लोकांची फोकसिंग खूप कमी झाली आहे. प्रत्येक गोष्टीला हस्तक्षेप होत आहे. हे असे का केले ? हे काय ? हे विचारले जात असल्याचे गोवारीकर यांनी म्हटले. सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म आला आहे. लोक सध्या नाटकांना जात नाहीत. थिएटरमध्ये चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक नाहीत . रिव्ह्यूज आले की जाऊ असे ठरवतात. अशी स्थिती हॉलिवूडमध्येही आली असून तिकडे तारांबळ उडाली असल्याचे गोवारीकर यांनी म्हटले. आता ओटीटी किंवा नवीन काय करायचे याचा विचार आपण करायला लागलो असल्याचे त्यांनी म्हटले.लोकांचा बघायचा दृष्टिकोन बदलायला लागला असून आजचा युवक झोपलेला का आहे? असा प्रश्न त्यांनी केला. 


गोवारीकर यांनी जागवल्या विद्यार्थी दशेतील आठवणी


आशुतोष गोवारीकर यांनी आपल्या विद्यार्थी दशेतील आठवणी यावेळी सांगितल्या. त्यांनी सांगितले की,  मला वडिलांनी विचारले होते की इंजिनिअरिंग की मेडिकल.. इंजिनिअरिंग घेतले रिझल्ट आला आणि मार्क्स आले 52 टक्के.. त्यानंतर बीएसस्सी केले. जे जे कॉलेजमध्ये आर्किटेक्ट घेतले आणि नापास झालो. वडिलांची इच्छा होती, त्यांच्या आशा मोठ्या होत्या. मॅनेजमेंट आणि केटरिंग कोर्सला ऍडमिशन घेतले त्यानंतर म्हटले स्पॅनिश शिकायचा कोर्स करतो. स्पॅनिश शिकताना घाबरलो होतो कारण नक्की मला करायचे काय हे कळत नव्हते, असेही गोवारीकर यांनी म्हटले. कॉलेजला नाटकात ओढला गेलो. अभिनयासाठी सगळीकडे मी ऑडिशन दिले. घरी मी सांगू शकत नव्हतो. होळीच्या नाटकात मी पाहिले काम केले. माझे वडील पोलीस ऑफिसर होते. त्यांना मी अभिनय क्षेत्रातील करिअरबद्दल विचारले, त्यांनी त्याला होकार दिला. मी शिकलेला प्रत्येक कोर्स मला माझ्या फिल्ममध्ये वापरता आला असल्याचे आशुतोष गोवारीकर यांनी सांगितले. अगदी कॉलेज जीवनापासून माझ्यासाठी चिकाटी आणि संयम हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा ठरला असल्याचेही आशुतोष गोवारीकर यांनी म्हटले