सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात उद्यापासून रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जाहीर केला आहे. 25 फेब्रुवारी पासून 7 मार्च पर्यंत रात्री 11 ते पहाटे पाच वाजेपर्यंत ही रात्रीची संचारबंदी लागू असणार आहे. अत्यावश्यक सेवेतील लोकांना मात्र या रात्रीच्या संचारबंदीतून सूट देण्यात येईल. तर 7 मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालय देखील बंद करण्याचा निर्णय पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जाहीर केला. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना मात्र यात दिलासा देण्यात आला आहे. दहावी आणि बारावीचे वर्ग तसेच अभ्यासिका ग्रंथालय यांना या निर्णयात सूट देण्यात आली आहे. केवळ 50 टक्के लोकांच्या उपस्थितीत अभ्यासिका आणि ग्रंथालय सुरु ठेवता येणार आहेत.


सोलापूर शहरातील कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता, चाचण्या वाढवण्याचा निर्णय देखील आज झालेल्या आढावा बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती दत्तात्रय भरणे यांनी दिली. अँटीजन आणि आरटीपीसीआर दोन्ही चाचण्यांवर भर देण्यात येणार आहे. तर शहर आणि ग्रामीण भागात कोविड केअर सेंटर तसेच डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल वाढवण्यात येणार आहेत.


जिल्ह्यातील सर्व क्रिडांगणावर कोणत्याही प्रकारच्या क्रीडा स्पर्धा भरवण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. तसेच लग्नसमारंभासाठी केवळ 50 लोकांना परवानगी देण्यात आली आहे. विवाहसोहळ्यात मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.


सोलापूर जिल्ह्यात परराज्यातून प्रवेश करणाऱ्या नागरिकांना देखील काही निर्बंधाना सामोरं जावं लागणार आहे. ज्याप्रमाणे महाराष्ट्रातून कर्नाटकात जाण्यासाठी तेथील शासनाने कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक केले आहे. त्याच पद्धतीने कर्नाटकसह इतर सर्व राज्यातून सोलापुरात येणाऱ्या नागरिकांना कोरोना निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असणार आहे. सीमा भागात याची तपासणी करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार असून सीमावर्ती भागातील जिल्हाधिकाऱ्यांना त्या पद्धतीने पत्र देखील पाठवण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.


कोरोनाचा जेव्हा राज्यात प्रादुर्भाव वाढलेला होता त्या काळात सर्वाधिक मृत्युदर असलेल्या शहरांच्या यादीत सोलापूरचे देखील नाव होते. ती परिस्थिती पुन्हा उद्भवू नये या साठी प्रतिबंधात्मक योजना राबविण्याचे जिल्हा प्रशासनाने निश्चित केले आहे. दरम्यान लॉकडाउनची भीती दाखवून कोणी व्यापारी साठेबाजी करत असेल किंवा साहित्य चढ्या दराने विकत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे निर्देश पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.


महत्त्वाच्या इतर बातम्या :