पालघर : पालघर जिल्ह्यातील तलासरीमधील वेवजीच्या वैजलपूर जंगलात 5 फेब्रुवारीला जळालेल्या अवस्थेत नेव्ही कर्मचारी सुरज कुमार दुबे आढळून आले होते. त्यानंतर तेथील स्थानिकांच्या मदतीने पोलीस प्रशासनाने डहाणूनंतर मुंबईच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. चेन्नई विमानतळावरून अपहरण करून त्यांच्याकडून दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याची फिर्याद सुरज कुमार यांनी मृत्यूपूर्वी पोलिसांना दिली. त्यानंतर पालघर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली शंभर पोलिसांच्या दहा टीमकडून या प्रकरणाचा तपास करण्यात आला. मात्र, या तपासात धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.


नेव्ही कर्मचारी सुरजकुमार दुबे यांचं खंडणीसाठी अपहरण झालं नसून त्यांनी स्वतः हा बनाव केला असल्याचं प्राथमिक तपासात उघड झाल आहे. सुरजकुमार दुबे यांनी शेअर मार्केटमध्ये लाखो रुपयांची गुंतवणूक केली असून या गुंतवणुकीत त्यांच मोठं नुकसान झालं होतं. तसंच सुरजकुमार दुबे यांनी नातेवाईक आणि मित्रांकडून लाखो रुपयांचे कर्जही घेतलं होतं. एका महिन्यामध्ये सुरज कुमार दुबे यांनी वेगवेगळ्या माध्यमातून तब्बल 17 लाख रुपयांच्या आसपास कर्ज घेतलं होतं तर पोलिसांनी मागवलेल्या सीबीचा रिपोर्टप्रमाणे जवळपास तेरा बँकांकडे कर्जाची मागणी केली होती.

मृत्युपूर्वी सुरज कुमार दुबे यांनी दिलेली संपूर्ण फिर्याद खोटी
या प्रकरणात चेन्नई आणि तलासरी येथील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून या सर्व सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुराजकुमार दुबे मुक्त विहार करत असल्याचं समोर आलं आहे. तर तलासरी येथील एका पेट्रोल पंपवरून त्यांनी तीनशे रुपयांचं डिझेल बाटलीत खरेदी केल्याचं उघड झालंय. मृत्युपूर्वी सुरज कुमार दुबे यांनी दिलेली संपूर्ण फिर्याद ही खोटी असून त्यांनी घेतलेले कर्ज आणि शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही बाब घरच्यांपासूनही लपवली असल्याचे उघड झाले. त्यामुळे कर्जाची परतफेड करावयास लागू नये म्हणून सुरज कुमार दुबे यांनी हा बनाव केला असल्याची माहिती पोलिसांसमोर समोर आली आहे. या तपासासाठी जिल्ह्यातील तब्बल शंभर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या दहा टीम वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आल्या होत्या.


स्वतः रचला बनाव, पण..
प्रत्यक्षात मात्र सुरज कुमार याने नेव्ही कर्मचारी असल्याने आपल्या डोक्याचा पुरेपूर वापर करून अवाढव्य घेतलेल्या कर्जातून पळ काढण्यासाठी सर्व बनाव रचण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याने चेन्नईत आल्यानंतर त्याचे मोबाईल बंद करण्यापासून स्वतःचा पेहराव बदलण्यासाठी वेगवेगळ्या हॉटेलचा आसरा घेऊन कोणालाही ओळख पटू नये म्हणून डोक्याचे केस कमी केले. पालघर पोलिसांनी केलेल्या तपासाप्रमाणे तो कोणत्याही रेल्वेने किंवा विमानाने चेन्नई ते तलासरीपर्यंत प्रवास न करता 5 फेब्रुवारी रोजी पहाटे बाय रोड पोहोचल्याची शक्यता वर्तवण्यात आली. तलासरी पेट्रोल पंपावर मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजनंतर पालघर पोलिसांनी सुरज कुमार दुबे याच्या बरोबर कोणीही धोका न केल्याच्या निष्कर्षापर्यंत पोहचले आहे. याबाबतीत दुबे यांच्या कुटुंबीयांसह नातेवाईकांचेही जबाब नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणात पालघर पोलिसांच्या सर्व दहा पथकांनी चेन्नई झारखंड तमिळनाडूपासून तलासरीपर्यंत सर्व सीसीटीव्ही तपासले आहेत. अजूनही पालघर पोलीस या घटनेचा अधिक खोलवर तपास करत आहेत.