पुणे : सागर गोरखे आणि रमेश गायचोर या कबीर कला मंचाच्या सदस्यांना दोघा शाहिरांना एनआयएने नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक केली आहे. तसेच पुण्यातील शनिवार वाड्यावर 31 डिसेंबर 2017 ला आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेत सागर गोरखे आणि रमेश गायचोर यांची महत्वाची भूमिका होती.
एल्गार परिषदेत या दोघांनी शाहिरी गीतं देखील सादर केली होती. दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 जानेवारी 2018 ला कोरेगाव भीमा या ठिकाणी झालेल्या हिंसाचार प्रकरणात आधी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आठ दिवसांनी तुषार दामगुडे या व्यक्तीने कोरेगाव भीमा या ठिकाणी झालेल्या हिंसाचाराला एल्गार परिषद कारणीभूत असल्याची तक्रार दिल्यानंतर पुण्यातील विश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये सागर गोरखे , रमेश गायचोर आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास तेव्हा पुणे पोलिसांकडे होता. पुणे पोलीसांनी गायचोर आणि गोरखे यांच्या घरी जाऊन तपास केला होता. मात्र त्यांना अटक करण्यात आली नव्हती. मात्र याच प्रकरणात पुणे पोलीसांकडून देशभरातील सामाजिक कार्यकर्ते, मानवाधिकार कार्यकर्ते आणि वकील असे मिळून 12 जणांना अटक करण्यात आली होती.
राज्यात सत्ता बदल झाल्यावर या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला. एनआयएने मागील महिन्यात या दोघांना चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यानंतर काल पुन्हा या दोघांना चौकशीसाठी बोलावलं होतं. या चौकशीदरम्यान एन आय ए च्या अधिकाऱ्यांनी आपल्यावर माफीचा साक्षीदार बनण्यासाठी दबाव आणल्याचा दावा रमेश गायचोर आणि सागर गोरखे यांनी केलाय. तुम्ही नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचं कबुल करा. त्यानंतर तुम्हाला माफीचे साक्षीदार बनवू अशी ऑफर दिली होती असा या दोघांचा दावा आहे. एनआयएच्या कार्यालयात जाण्याआधी एक व्हिडीओ शुट करुन या दोघांनी त्यांचं म्हणणं मांडलय . रमेश गायचोर आणि सागर गोरखे या दोघांवर 2011 साली देखील नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप झाला होता आणि 2013 साली त्यांना अटक देखील झाली होती. त्यानंतर त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली होती.