मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना रनौत आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये वाकयुद्ध सुरु आहे. हे वाकयुद्ध आता शिगेला पोहोचलं आहे. विधानसभेत रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव मांडल्यानंतर आता विधानपरिषदेत काँग्रेस नेते भाई जगताप यांनी कंगना रनौतविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला.


ही नटी ड्रग्ज घेत असल्याचं अध्ययन सुमनने 2016 मध्ये एका मुलाखतीत सांगितलं होतं. ही महिला राज्याबद्दल बोलते, तिच्याविरोधात हक्कभंग आला आहे, असं भाई जगताप यावेळी म्हणाले. आता सभापती यावर काय निर्णय घेतात ते पाहावं लागेल.


..तर कंगनाची चौकशी करणार : गृहमंत्री अनिल देशमुख
कंगना ड्रग्स घेते असे आरोप शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमन यांनी एका मुलाखतीत केले होते. त्यासंदर्भात चौकशी करण्याची मागणी प्रताप सरनाईक यांनी केली होती. त्याचीही चौकशी आम्ही करणार आहोत, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सभागृहात सांगितलं.


तसंच महाराष्ट्र पोलिसांचा अवमान करण्याचा अधिकार कोणाला नाही. आम्ही त्याचा निषेध करतो. महाराष्ट्र कुठल्या एका पक्षाचा नाही. तो भाजपचा सुद्धा आहे, भाजपनेही अशा व्यक्तींचा निषेध नोंदवायला हवा, असंही गृहमंत्री म्हणाले.


अर्णब गोस्वामींविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी राज्याचे मुख्यमंत्री तसेच इतर नेत्यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत अवमान केला. त्यांचं हे वागणं हेतुपुरस्सर आणि आक्षेपार्ह असून अर्णब गोस्वामी यांच्यावर विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव विधीमंडळाच्या अधिवेशनात मांडण्यात आला. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी हा प्रस्ताव मांडला. तसेच या प्रस्तावाला मंजुरी देण्याची मागणीही त्यांनी सभागृहात केली. तसेच अर्णब गोस्वामी सुपारीबाज पत्रकार आहेत, असा आरोपही केला.


संबंधित बातम्या


रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंगाची नोटीस


कंगना रनौतच्या ऑफिसला बीएमसीकडून नोटीस; रहिवाशी जागेचा कार्यालयीन वापर केल्याचा ठपका