Maharashtra Politics : राज्यसभेतील नवनिर्वाचित खासदारांचा आणि राज्याच्या विधान परिषदेतील नवनिर्वाचित आमदारांचा आज शपथविधी पार पडला. महाराष्ट्रातून निवडून आलेल्या सहापैकी तीन सदस्यांनी राज्यसभा खासदारकीची शपथ घेतली. महाराष्ट्रातून निवडून आलेल्या केंद्रीय मंत्री पियूष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक या भाजपच्या तीन खासदारांनी आज शपथ घेतली. तर, विधान परिषदेच्या 10 नवीन आमदारांनी सदस्यत्वाची शपथ घेतली. 


राज्यसभेचे सदस्य म्हणून महाराष्ट्रातून सहा सदस्य निवडून गेले आहेत. भाजपचे राज्यसभा सदस्य म्हणून केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी हिंदीतून तर अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांनी मराठीतून शपथ घेतली. तर, शिवसेना नेते संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असल्यामुळे त्यांचा शपथविधी झाला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल पटेल आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी हे देखील अनुपस्थित होते. त्यामुळे त्यांचा शपथविधी आज झाला नाही. 


विधान परिषद सदस्यांचा शपथविधी 


विधान परिषदेच्या 10 नवनियुक्त आमदारांचा शपथविधी आज विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये पार पडल. भाजपचे प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, राम शिंदे,  राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे, रामराजे नाईक निंबाळकर, काँग्रेसचे भाई जगताप, शिवसेनेचे सचिन अहिर, आमश्या पाडवी या सदस्यांनी विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. 


महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा धक्कादायक पराभव झाला होता. तर, दुसऱ्या पसंतीचे उमेदवार भाई जगताप विजयी झाले. या निवडणुकीनंतर शिवसेनेतील अभूतपूर्व बंड समोर आले. निवडणूक निकालानंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह गुजरातमधील सूरत गाठले होते. त्यानंतर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्यात.