Maharashtra MLC Election 2022 Cross Voting : राज्याच्या विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांवर पक्षांतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी लवकरच मुंबईत येऊन पक्षाच्या आमदारांसोबत वन टू वन बातचीत करणार आहेत. पक्षाकडून पहिल्या पसंतीचं मत चंद्रकांत हंडोरे यांना न दिल्यामुळे आमदारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या आमदारांची लवकरच पक्षांतर्गत चौकशी होण्याची शक्यता आहे.


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतीच पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीत नाना पटोले यांनी विधानपरिषद निवडणुकीत झालेल्या क्रॉस व्होटिंग आणि चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव याची माहिती दिली होती. त्यानंतर आता हालचालींना वेग आला आहे. 


20 जून रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेची निवडणूक पार पडली. या निवडणूक निकालात मोठा उलटफेर पाहायला मिळला. काँग्रेसची पहिल्या पसंतीची तीन मत फुटल्याने पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. तर दुसऱ्या पसंतीचे उमेदवार भाई जगताप हे दुसऱ्या आणि तिसऱ्या मतांच्या फेरीत विजयी झाले. भाजपचे पाचव्या क्रमांकाचे उमेदवार प्रसाद लाड यांचा दुसऱ्या फेरीत विजय झाला. 


पक्षाच्या आदेशानंतरही क्रॉस व्होटिंग
पक्षाच्या आदेशानुसार पहिल्या पसंतीचे मत चंद्रकांत हंडोरे यांना देण्याचं निश्चित झालं होतं. काँग्रेसने हंडोरे यांच्यासाठी 29 मतांचा कोटा ठरवला होता. परंतु त्यांना 22 मतं मिळाली. परंतु सुमारे 10 मतांमध्ये गडबड झाली आणि पक्षाचे पहिले उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा विधान परिषदेच्या निवडणुकीत पराभव झाला. त्यामुळे क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांना शोधून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे असं मत पक्षात तयार झालं होतं. त्यानुसार आता महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी मुंबईत येऊन आमदारांशी चर्चा करणार असून, क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्याची शक्यता आहे


विधानपरिषद निवडणुकीचा निकाल


भाजप : प्रवीण दरेकर (29 मते), श्रीकांत भारतीय (30 मते), राम शिंदे (30 मते), उमा खापरे (27 मते), प्रसाद लाड (28 मते)


राष्ट्रवादी काँग्रेस : रामराजे नाईक निंबाळकर (29 मते ), एकनाथ खडसे (28 मते)


शिवसेना : सचिन अहिर (26 मते), आमशा पाडवी (26 मते)


काँग्रेस : भाई जगताप (26 मते), चंद्रकांत हंडोरे (पराभूत 22 मते)


संबंधित बातम्या