राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी स्टील बांधणीच्या परिवर्तन बसची घोषणा केली होती. याआधी एसटी बस अल्यूमिनियम बांधणीची होती. प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करत आता ही बस स्टीलमध्ये बांधण्यात येईल. अल्यूमिनियमच्या बस वजनाने हलक्या होत्या, तसंच अपघातामध्ये होणाऱ्या बसच्या नुकसानीची तीव्रताही अधिक होती. त्यामुळे मजबूत आणि दणकट अशा माइल्ड स्टीलमध्ये नव्या एसटी बसची बांधणी करण्यात आली आहे.
या नव्या बसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेच्या अनुषंगानं अनेक बदल करण्यात आले आहेत. या बसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आल्याचं एसटी महामंडळानं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
कशी असेल एसटीची नवी परिवर्तन बस?
- या बसची उंची जुन्या बसपेक्षा 30 सेंमीनं वाढवण्यात आली आहे.
- बसची उंची वाढल्यानं लगेज स्पेसमध्येही तिपटीनं वाढ
- जुन्या बसपेक्षा खिडक्या आकारानं मोठ्या
- सांध्यांमध्ये थर्माकॉलचा वापर, त्यामुळे प्रवासात गाडीचा आवाज होणार नाही.
- एलईडी मार्ग फलक
- प्रवाशांना सुचना देण्यासाठी कंडक्टरजवळ माईक आणि स्पिकरची सोय
- गाडीत हवा खेळती राहण्यासाठी छताला तीन रुफ हॅच
- बसचे नादुरुस्त चाक बदलण्यासाठी पर्यायी चाक सहज उपलब्ध होईल अशी रचना
- संकटकाळी प्रवाशांना सतर्क करण्यासाठी अलार्मची सोय
- बस धावताना हवेचा रोध करण्यासाठी बसचं एरोडायनॅमिक डिझाईन