उस्मानाबाद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 13 मे रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यात दौरा आहे. हा दौरा जाहीर होताच उस्मानाबाद प्रशासनाची एकच धावपळ उडाली आहे. या धावपळीत मुख्यमंत्र्यांना सर्व चांगलं-चांगलं दाखवण्यासाठी प्रशासनाकडून बनवेगिरी करण्यात येत असल्याचेही समोर आले आहे.


पानी फाऊंडेशनचे शेततळेही कृषी विभाग आपल्या नावे दाखवत भूजल सर्वेक्षणाने मुख्यमंत्र्यांच्या मार्गावरील नदी पात्रात एका रात्रीत जवळपास 8 ते 10 रिचार्ज शाफ्टचे बोअर घेतले आहे.

एकंदरीत मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिखाव्यासाठी कंबर कसली आहे. हे सारं बघून शेतकरी आणि नागरिक विचारत आहेत, हेच आहेत का अच्छे दिन?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी भूम तालुका दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री झाल्यापासूनचा  त्यांचा हा तालुक्यातील दुसरा  दौरा असून या दौऱ्या दरम्यान राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजने अंतर्गत कामांची ते हाडोंग्री, हिवरा, आरसोली या गावात पाहणी करणार आहेत. हा दौरा निश्चित होताच तालुका कृषी अधिकारी यांच्यासह संपूर्ण कृषी विभागाची चांगलीच दमछाक होत असल्याचे दिसत आहे.

कृषी विभागाकडून सिंचन योजने अंतर्गत मागेल त्याला शेततळे ही योजना गाजा वाजा करत राबवल्याचे अधिकारी सांगत आहेत. मात्र, वास्तुस्तिथी याउलट वेगळीच असल्याचे दिसून येते.

भूम तालुक्यात या योजनेसाठी कृषी विभागाला 337 शेततळ्यांचे टार्गेट देण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात फक्त 45 शेततळी पूर्ण झाली असल्याचे दिसून येत आहे. यामागची कारणे कृषी विभागात शेततळे मागण्यास जाणारा शेतकरीच व्यवस्थित सांगू शकेल. या सर्व परिस्थितीवर पांघरून घालण्यासाठी व मुख्यमंत्री यांना काम दाखवण्यासाठी 10 मे पासून तालुका कृषी अधिकारी व सर्व कर्मचारी जोमाने कामाला लागले आहेत.

याच विकास कामाचा एक भाग म्हणजे हिवरा या गावास दोन महिन्यांपासून सुरू  असलेल्या पाणी फाऊंडेशनच्या श्रमदान झालेल्या ठिकाणी मुख्यमंत्री भेट देणार आहेत. या श्रमदानात ग्रामस्थांनी काही शेततळी देखील केली आहेत. परंतु, ते शेततळे खाजगी असल्याने व मुख्यमंत्री महोदय नेमके त्याच ठिकाणी भेट देणार असल्याने कृषी विभागाची पुरती तारांबळ उडाली आहे. त्यामुळे तेथील श्रमदानातून झालेल्या कामाचे श्रेय कृषी विभाग लाटण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी सदरचे शेततळे कृषी विभागाने केले आहे असे भासवून त्याचे अनुदानही संबधित शेतकऱ्याला देण्याबाबत हालचाली होत आहेत.

भूजल विभागाचे एका रात्रीत रिजार्च शाफ्ट

भूजल विभागाने तर कहरच केल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री फडणवीस ज्या मार्गाने जाणार आहेत. त्या मार्गावरील रस्त्यालगतच्या नदी, ओढ्यांमध्ये रात्रीतून 100 फूट खोलीचे बोअर हिवरा येथे नदीपात्रात पाडले आहेत.

विशेष म्हणजे जुन्या रिचार्ज शाफ्टची अवस्था देखभालीअभावी अत्यंत दयनीय आहे. एवढेच नव्हे तर तीन वर्षीपूर्वी हिवरा येथील नदीपात्रात खोलीकरण व रुंदीकरणाचे काम करण्यात आले होते. त्याचीही दयनीय अवस्था झाली होती. परंतु, या निमित्ताने तेथेही साफसफाई व डागडुजी करण्यात येत आहे.

प्रशासकीय यंत्रणेची धावपळ

भूम तालुक्यात जलयुक्त व रोजगार हमी योजनेसह इतर कामांमध्ये  अनियमितता झाल्याची ओरड गावोगावी होत आहे. अनेक योजनांचा निधी अधिकारी व राजकारण्यांनी मिळून नातेवाईकांनाच हताशी धरून उचलल्याचेही आरोप होत आहेत. तालुक्यात जलयुक्त व रोजगार हमी योजनेची कुठलीही कामे चालू नाहीत. परंतु, मुख्यमंत्र्यांचा दौरा लागला की अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. मोजकी चार दोन कामे रात्रंदिवस जेसीबीच्या सहाय्याने चालू ठेवून  मुख्यमंत्री यांना दाखविली जाणार असल्याचे दिसत आहे.