मुंबई : महाराष्ट्र पोलिसांच्या गणवेशात अतिरिक्त टोपीचा समावेश करण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दैनंदिन कामकाजात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांच्या डोक्यावर आता बेसबॉल प्रकारातील टोपी दिसणार आहे. राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल यांची स्वाक्षरी असलेलं परिपत्रक विभागातर्फे जारी करण्यात आलं आहे.
परिपत्रकानुसार, "या टोपीची पकड घट्ट असल्याने कर्तव्य पार पाडताना ती डोक्यावरुन पडण्याची शक्यता फारच कमी आहे. तसंच या टोपीमुळे उन्हापासून चेहऱ्याचं संरक्षण होतं. बेसबॉल प्रकारातील नवीन टोपीचा अतिरिक्त टोपी म्हणून समावेश झाला आहे."
"सर्व घटक प्रमुखांनी आपल्या मनुष्यबळाच्या संख्येप्रमाणे या टोप्या तयार करुन घ्याव्यात. सर्व पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांना त्या उपलब्ध करुन द्याव्यात. नवीन टोपी तयार करताना ही नमुना टोपी सारखीच राहील यामध्ये घटक कार्यालयाच्या स्तरावर कोणतेही फेरबदल करु नयेत. तसंच गणवेशासाठी 5167 रुपये या रकमेतून टोपीचा खर्च भागवण्यात यावा," असे निर्देशही परिपत्रकात देण्यात आले आहेत.