उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील तलमोड येथे पोलिसांच्या मारहाणीत वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे. दत्तू मोरे असं या 70 वर्षीय शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेच्या निषेधार्थ तलमोड गावातील शेकडो गावकऱ्यांनी पहाटे पाच वाजल्यापासून मृतदेहासह ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.




सविस्तर माहिती अशी की, उमरगा तालुक्यातील तलमोड नजीकच्या कराळी येथे मागील रविवारी चारचाकी गाडीचे पुढील चाक टायर फुटून गॅसचा स्फोट झाल्याने तिघांचा जळून मृत्यू झाला होता. यावेळी तलमोड येथील काही युवकांनी पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली होती. तसेच अग्निशामक दलाची गाडी आडवी केली होती.

याप्रकरणी पोलिसांनी गंभीर गुन्हे नोंद केले होते. या घटनेचा तपास करणारं पोलीस पथक बुधवारी रात्री दगडफेक करणाऱ्या आरोपींना पकडण्यासाठी तलमोड येथे गेलं होतं. यावेळी पोलिसांनी पाच-दहा युवकांना पकडलं, सोबतच यावेळी दत्तू मोरे यांना जबर मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. यावेळी पोलिसांनी गावातील नागरिकांच्या घराचे दरवाजे सुद्धा तोडले.



यानंतर गावातील वातावरण तणावपूर्ण झाले असून उमरगा पोलीस ठाण्यात तलमोड गावातील शेकडो महिला आणि पुरुष पहाटेपासून ठिय्या मांडून आहेत.

दरम्यान,  कोणत्याही निष्पाप व्यक्तीवर जाणून बुजून कारवाई होणार नाही. सखोल चौकशी करुनच आरोपींविरूध्द कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख आर राजा यांनी दिली आहे.

दोन दिवसापूर्वी कराळी येथे जीप जळून दुर्घटना घडली होती. यावेळी संतप्त जमावाने पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात 25 ते 30 जणांविरुध्द गंभीर गुन्हा नोंद केला आहे.