Maharashtra Health News : मुंबई : राज्यातील बालमृत्यू (Infant Mortality) कमी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्‍य विभागामार्फत सातत्‍याने प्रयत्‍न करण्‍यात येत असून या प्रयत्नांना यश आल्याचे गेल्या काही वर्षाच्या केंद्र सरकारच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारच्या संस्‍थांनी केलेल्‍या सर्व्‍हेनुसार ही माहिती पुढे आली आहे. केंद्र शासनाच्‍या 2018 च्या एसआरएस अहवालानुसार महाराष्ट्राचा अर्भकमृत्यू दर हा प्रति 1000 जन्मामागे 19 असा होता,  त्यात घट होऊन सन 2020 च्या एसआरएस अहवालानुसार हा 16 झाला  आहे. तसेच सन 2020 च्या एसआरएस अहवालानुसार राज्याचा नवजात मृत्यू दर हा 11 असून महाराष्ट्राने शाश्वत विकास ध्येयाचे (एसडीजी 2023) नवजात मृत्यू दर 12 पेक्षा कमी करण्याचे लक्ष्य गाठलं आहे. 


नवजात बालकांसाठी खास एसएनसीयू युनिट (SNCU - Special Newborn Care Units)


राज्यातील जिल्‍हा रुग्णालय,  स्त्री  रुग्णालय  आणि  काही  उपजिल्‍हा रुग्णालयांत एसएनसीयूची स्थापना करण्यात आलेली आहे. राज्यात एकूण 53 एसएनसीयू (SNCU) कक्ष स्थापन  करण्यात आले  आहेत. या ठिकाणी  बाळ  जन्मल्‍यानंतर बाळाचे वजन कमी असल्‍यास, काविळ झाली असल्‍यास किंवा त्याला इतर कोणताही त्रास असल्‍यास बाळाला  एसएनसीयू  कक्षामध्ये  दाखल  करुन  उपचार  केले  जातात. एसएनसीयु मध्ये  किमान  12  ते  16  खाटा  असून  हा  कक्ष  रेडियंट  वॉर्मर, फोटोथेरपी युनिट, इन्प्युजन पंप, मॉनिटर्स, नॉन इनवेसिव्ह व्हेंटीलेशन (सीपीएपी) यासारख्या उपकरणांनी सुसज्‍ज आहे. राज्यात एप्रिल 2023 ते जानेवारी 2024  पर्यंत एकूण 56467 बालकांवर एसएनएसीयुमध्ये  उपचार  करण्यात आले.  त्यामध्ये  1500  ग्रॅम  पेक्षा  कमी  वजनाच्या  5459  बालकांचा समावेश आहे.


एनबीएसयू (NBSU)


राज्यातील ग्रामीण रुग्णालये (RH) आणि उपजिल्‍हा रुग्णालय (SDH) येथे एनबीएसयू (NBSU) कार्यरत आहेत. राज्यात एकूण 200 एनबीएसयु असून येथे सौम्य आजार असलेल्‍या नवजात बालकांवर उपचार केले  जातात.  या कक्षामार्फत  रेडियंट वॉर्मर, फोटोथेरपी युनिट, पल्‍स ऑक्सीमीटर, कांगारु मदर केअर, स्‍तनपानाची लवकर सुरुवात, ऑक्सिजन सलाईन या सेवा देण्यात येतात. राज्यात माहे एप्रिल 2023 ते जानेवारी 2024 पर्यंत एकुण 24063 बालकांवर उपचार करण्यात आले. 


माँ ( मदर एब्सुल्युट अफेक्शन) कार्यक्रम


स्तनपानाविषयी मातेला, वडिलांना तसेच कुटूंबियांना योग्य माहिती पुरविण्यासाठी तसेच स्तनपान आणि शिशुपोषणास सक्षम असे वातावरण तयार करण्यासाठीचा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाअंतर्गत प्रचार आणि प्रसिध्दी, स्तनदा आणि गरोदर मातांसाठी आशांमार्फत घेण्यात येणाऱ्या माता बैठका, आरोग्य कर्मचाऱ्यांना स्तनपान आणि शिशूपोषणाचे प्रशिक्षण, सनियंत्रण आणि  मूल्‍ययमापन, सर्व आरोग्य संस्थांचे शिशू मैत्रीकरण यासारखे उपक्रम राबविले जातात. यामध्ये सहा महिन्यापर्यंत निव्वळ स्‍तनपान आणि सहा महिन्यानंतर पूरक आहार देण्‍याबाबत समुपदेशन करण्यात  येते. माहे एप्रिल 2023  ते  डिसेंबर 2023 पर्यंत एकूण 172941 माता बैठका झाल्‍या असून यामध्ये 1374515 मातांचं समुपदेशन करण्यात आलं आहे.


ॲनिमिया मुक्‍त भारत कार्यक्रम


राज्यातील लहान बालके, किशोरवयीन मुले आणि मुली, गर्भवती आणि स्तनदा मातांमधील रक्तक्षयाचे प्रमाण कमी करण्यासाठी पोषण अभियानांतर्गत ॲनिमिया मुक्त भारत हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सहा महिने ते 59 महिने आणि 5 ते 9 वर्ष या वयोगटातील बालकांना, 10 ते 19 वर्षे वयोगटातील  किशोरवयीन मुला-मुलींना, गर्भवती, स्तनदा माता आणि प्रजननक्षम वयोगटातील स्त्रीया यांना लोह आणि फॅालिक ऑसिड (IFA) या औषधाची प्रतिबंधात्मक पूरक मात्रा देण्यात येते. तसेच रक्तक्षय असलेल्‍या लाभार्थ्यांना  आवश्यक उपचार आणि संदर्भ सेवा देण्यात येते.


गृहस्तरावर नवजात बालकांची काळजी


राज्यातील नवजात शिशु आणि अर्भक मृत्यू कमी करण्यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येतो. या  कार्यक्रमांतर्गत  आशांना 1 ते 4 टप्याचे प्रशिक्षण देण्यात येते. आशांव्दारे एच.बी.एन.सी. प्रशिक्षणाच्या आधारावर नवजात बालकांना 42 दिवसात सहा ते सात गृहभेटी देण्यात येतात. आरोग्य संस्थेत प्रसूती झालेल्‍या माता आणि नवजात बालकांस आशा मार्फत सहा गृहभेटी (3,7,14,21,28 आणि 42 व्या दिवशी) देण्यात येतात. घरी प्रसूती झालेल्‍या माता आणि नवजात बालकांस आशामार्फत सात गृहभेटी (1,3,7,14,21,28 आणि 42 व्या दिवशी) देण्यात  येतात. गृहभेटी दिल्‍यास प्रत्येक आशा सेविकेला 250 रुपये इतके मानधन मिळते. याद्वारे प्रसूतीच्या 42 दिवसांपर्यंत आई आणि नवजात  बालक दोघेही सुरक्षित राहतील याची  खात्री करण्यात येते. गृहभेटी दरम्यान जंतुसंसर्ग, न्युमोनिया, हायपोथर्मिया, ताप, स्तनपान समस्या, अतिसार, कमी दिवसाची बालके, कमी वजनाची बालके, डोळयाने दिसणारे जन्मजात व्यंग अशी बालके आढळल्‍यास नवजात शिशुंना जवळच्या शासकिय आरोग्य संस्थेत संदर्भित करण्यात येते. बालकांच्या तपासणी दरम्यान आढळलेल्‍या बाबींची नोंद करण्याकरिता आशांना एचबीएनसी बुकलेट उपलब्ध करुन दिले आहे.


गृहस्तरावर लहान बालकांची काळजी


राज्यातील अर्भक मृत्यू कमी करण्यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येतो. या कार्यक्रमांतर्गत आशांना पाच दिवसीय प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षण पूर्ण झाल्‍यानंतर 3,6,9,12 आणि 15  महीने पूर्ण झालेल्‍या बालकांना आशांमार्फत गृहभेटी देण्यात येतात. उपरोक्त वेळापत्रकाप्रमाणे गृहभेटी दिल्‍यास प्रत्येक आशा सेविकेला 250 इतके मानधन देण्यात येते. गृहभेटी दरम्यान पोषण, आरोग्य, प्रारंभिक बालपणातील विकास आणि वैयक्तिक आणिपरिसर स्वच्छता या चार प्रमुख बाबींवर भर देण्यात येतो.