नागपूर : अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांच्या सोयीसुविधांचा मुद्दा पुन्हा एकदा गाजला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी याकडे सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या जेवणाची गैरसोय आणि सोयीसुविधांकडे सरकारचं लक्ष नसल्याबाबत त्यांनी औचित्याचा मुद्दा मांडला.


हिवाळी अधिवेशनासाठी मंत्र्यांच्या सुरक्षेसाठी येणाऱ्या राज्यभरातील पोलिसांची नागपूर येथे राहण्याची-खाण्याची सोय योग्यप्रकारे केली जात नसल्याची बाब समोर आली, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.

''24 तास सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या पोलिसांना त्यांची ज्या ठिकाणी नेमणूक करण्यात आली आहे. त्या ठिकाणी किमान खाण्याची आणि राहण्याची सोय होते की नाही? त्यांना डाळ-भात तरी मिळतो की नाही? याकडे सरकारचं दुर्लक्ष आहे'', असंही जयंत पाटील म्हणाले.

दरम्यान अधिवेशनासाठी बंदोबस्तात तैनात असणाऱ्या पोलिसांनी व्यवस्थित जेवणही मिळत नसल्याचं एबीपी माझाने समोर आणलं होतं. पहिल्या दिवशी पोलिसांना केवळ डाळ-भात देण्यात आला, एबीपी माझाने ही बातमी दाखवल्यानंतर संबंधित केटररची हकालपट्टी करण्यात आली. मात्र दुसऱ्या दिवशीही असंच काहीसं चित्र पाहायला मिळालं.

पहिल्या दिवशी पोलिसांना निकृष्ट जेवण मिळालं, तर दुसऱ्या दिवशी वेळेवर जेवण न आल्याने पोलिसांना उपाशीच रहावं लागलं. पोलीस जेवणासाठी जेवणाच्या वेळेत हजर झाले, मात्र जेवणच आलं नव्हतं. त्यामुळे पोलिसांना उपाशीपोटी कर्तव्यावर हजर व्हावं लागलं. हाच मुद्दा जयंत पाटील यांनी विधानसभेत उपस्थित केला.