नागपूर : आजपर्यंत राज्यातील 36 पैकी 30 जिल्ह्यात आपण रस्त्यावरुन प्रवास केला. यादरम्यान, केलेल्या पाहणीत 22 हजार 795 किलोमीटरचे रस्त्यांवरील खड्डे भरल्याचा दावा सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. तसेच 17 जिल्ह्यातील रस्ते 100 टक्के खड्डेमुक्त झाल्याचा विश्वासनही त्यांनी व्यक्त केला आहे.

राज्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीची माहिती देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, "15 डिसेंबरपर्यंत राज्यातील सगळ्या जिल्ह्यात प्रवास केला. यावेळी 36 जिल्ह्यातील 30 मी स्वत: जाऊन रस्ते दुरुस्तीच्या कामांची पाहाणी केली. यातील 17 जिल्ह्यातील रस्ते शंभर टक्के खड्डेमुक्त झाले आहेत. आम्ही राज्यातील एकूण 22 हजार 795 किमी रस्त्याचे खड्डे भरले असून, आज मध्यरात्रीपर्यंत खड्डे भरण्याचे काम शंभर टक्के पूर्ण होईल."

ते पुढे म्हणाले की, "राज्यातील एकूण 23 हजार 381 किमी लांबी रस्त्यावरील 22 हजार 736 रस्त्यांवरील खड्डे भरले आहेत. ग्रामीण भागातील रस्ते खड्डे भरण्याचं काम सुरु आहे. आज दुपारी 3 वाजेपर्यंत 98 टक्के रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम झाले असून, आज मध्यरात्री 100 टक्के खड्डे भरले जातील."

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंच्या टीकेलाही चंद्रकांत पाटलांनी उत्तर दिलं. "मी कधी हेलिकॉप्टर मधून प्रवास केला? हे सुप्रिया ताईंनी दाखवून द्यावं," असं आव्हान त्यांनी यावेळी दिलं. तसेच, "त्या जेव्हा मला यवतमाळला भेटल्या होत्या, तेव्हा माझ्या कामावर समाधान व्यक्त केलं होतं," असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

शिवाय, जर काही ठिकाणी खड्डे असतील, तर सामान्य लोकांनी सांगावं. जिथे खड्डा आहे असेल, तिथे मी स्वत: खुर्ची टाकून बसेन, आणि खड्डा भरून देईन, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

दरम्यान, पाटील यांनी खड्डेमुक्तीसाठी दिलेल्या डेडलाईनचा आज शेवटचा दिवस आहे. मात्र, अद्याप राज्यातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. सुप्रिया सुळेंनी यावर प्रतिक्रिया देताना, हे सरकार खोटारडं असल्याचा आरोप केला.

संबंधित बातम्या

खड्डेमुक्त रस्त्याच्या डेडलाईनचा आज शेवटचा दिवस