नीट पेपरफुटी प्रकरणी( NEET Paper leak case) सापडलेल्या आरोपींना ६ तारखेपर्यंत सीबीआय (CBI) कोठडी देण्यात आली आहे. पेपर फुटीत सापडलेल्या आरोपींच्या कस्टडीसाठी सीबीआय पथकाने कोर्टात अर्ज दाखल केला होता. यावर झालेल्या सुनावणीत हा निर्णय लाजतमर  देण्यात आला आहे. 


नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयच्या पथकाने मुख्य न्यायदंडाधिकारी लातूर न्यायालयात आरोपीचा ताबा मिळवण्यासाठी अर्ज केला होता. हा अर्ज न्यायालयाने मंजूर केला असून आरोपीचा ताबा आणि तपासातील सर्व कागदपत्रे व जप्त ऐवज महाराष्ट्र पोलिसांनी सीबीआय कडे द्यावा असा आदेश देण्यात आला आहे. त्यानुसार काल दिवसभर सर्व कागदपत्रांची छाननी करण्यात आली. पोलिसांनी तपास केलेल्या कागदपत्रांची वर्गवारी करण्यात आली असून ताबा आता सीबीआयकडे देण्यात आला आहे.


आज न्यायालयात काय झाले? 


आरोपीच्या कस्टडीसाठी सीबीआय पथकाने जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. या प्रकरणातील लातूर पोलिसांकडे अटक असणारे दोन आरोपी जलील पठाण आणि संजय जाधव यांचा ताबा सीबीआय कडे सोपवण्यात यावा यावर न्यायालयात सुनावणी झाली. यासाठी आज दुपारपासून संध्याकाळपर्यंत सीबीआयचे पथक न्यायालयात हजर होते.


सीबीआय अधिकाऱ्यांच्या मते, हे प्रकरण देशव्यापी असून यात काही लोक अद्याप फरार आहेत. यांच्या मोबाईलमधून अनेक लोकांशी आर्थिक व्यवहार झाले आहेत, जे तपासणे बाकी आहे. अटक झालेल्या दोन आरोपींनी स्वतःबरोबर इतर नातेवाईकांच्या नावेही काही आर्थिक व्यवहार केले आहेत. याचे सर्व तपशील गोळा करणे आवश्यक आहे. त्यामुळे या आरोपींचा ताबा सीबीआय कडे देण्यात यावा अशी विनंती सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. 


सरकारी वकील मंगेश महेंद्रकर यांनी सांगितले की, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता यात मोठे नेटवर्क आहे. तसेच नीट चा पेपरच नाही तर इतर पेपर मध्येही अशा स्वरूपाचा प्रकार झाल्याचं काही अंशी दिसून येत आहे. त्याचा तपास होणे आवश्यक असल्याने आरोपींना सीबीआय कोठडी देण्यात यावी. 


आरोपींना कोठडी नकोच- वकिलांचा युक्तीवाद


या प्रकरणात अटक झालेले आरोपी संजय जाधव यांचे वकील बळवंत जाधव यांनी युक्तिवाद करताना स्पष्ट केले की नीट परीक्षा घेणाऱ्या यंत्रनेशी आरोपी संजय जाधव कुठेही जोडले गेले नव्हते. ते जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक आहेत. केवळ त्यांच्या मोबाईल मध्ये काही ऍडमिट कार्ड आढळून आल्याने किंवा त्यांनी आर्थिक व्यवहार केल्याचे समोर आल्याने हे स्पष्ट होत नाही की त्यांनी नीट परीक्षा यंत्रणेत दखलअंदाजी केली.
या प्रकरणात महत्त्वपूर्ण भाग हा मोबाईलचा आहे. मोबाईल मधल्या डाटाचा आहे. मागील सात दिवसात पोलिसांनी आरोपींचे मोबाईल जप्त केल्यास असून बँक खातेही सील केली आहेत. घरातील, कार्यालयातील कागदपत्र सील केली आहेत. असे असताना सीबीआयने तपास पुढे चालू ठेवावा मात्र, आरोपींना पुन्हा कोठडी वाढवून देऊ नये. असा युक्तिवाद करण्यात आला. 


या प्रकरणातील दुसरे अटकेत असणारे आरोपी जलील पठाण यांचे वकील श्रीकांत बोराडे यांनी, या घटनेची निगडित असलेली सर्व माहिती मागील काही दिवसात एटीएस नांदेड, शिवाजीनगर लातूर आणि त्यानंतर डीवायएसपीच्या तपास पथकाने गोळा केली आहे. ही सर्व माहिती सीबीआय कडे देण्यात आली असताना पुन्हा आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात येऊ नये. असा युक्तिवाद करण्यात आला.


दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने सहा तारखेपर्यंत या दोन्ही आरोपींना सीबीआय कोठडी सुनावली. यासाठी सकाळपासून सीबीआयचे पथक लातूरच्या न्यायालयात हजर होते. मात्र दुपारनंतर सुनावणी सुरू झाली. पाचच्या आसपास सुनावणी संपली असून आता या प्रकरणात पुढील तपास सीबीआय करणार आहे. 


काय होतं लातूर नीट प्रकरण? 


लातूर पोलिसांनी नीट पेपर फुटी प्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. या चार जणांपैकी दोन जणांना अटक करण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे. यात जलील पठाण आणि संजय जाधव या दोन आरोपींचा समावेश आहे.  फरार आरोपींचा शोध सुरू आहे. 


या चार जणांनी मिळून लातूर मधील अनेक विद्यार्थ्यांना परराज्यामध्ये नीट परीक्षा देण्यासाठी तयार केलं होतं. यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचं समोर येतंय. आरोपीच्या मोबाईल मध्ये विद्यार्थ्यांचे 12 एडमिट कार्ड सापडले आहेत. त्यापैकी आठ ऍडमिट कार्ड हे परराज्यातील असून उर्वरित आठ पैकी सात कार्ड हे बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे असून एक विद्यार्थी लातूरचा आहे. या टोळीचे देशातील कोणत्या राज्यात कनेक्शन आहेत याचा तपास आता सीबीआय करणार आहे.


वाचा संबंधित वृत्त: 


NEET Paper Leak Case: सीबीआयनं खाक्या दाखवताच आरोपींना फुटला घाम, चौकशीत धक्कादायक गोष्टी उघड होणार?