उस्मानाबाद/लातुर/औरंगाबाद: केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अनिवार्य झालेली वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश परिक्षा अर्थात 'नीट'ची अत्यंत अपुरी तयारी केली आहे.
महाराष्ट्रासाठी फक्त सहाचं परिक्षा केंद्र मंजूर झाले आहेत. म्हणजे बांद्याच्या विद्यार्थ्याला मुंबईला आणि चांद्याच्या विद्यार्थ्याला नागपूरला जावून परीक्षा देण्याशिवाय पर्याय नाही.
प्रत्येक विद्यार्थ्याला किमान दहा हजार भुर्दंड लागेल. परीक्षेअधीचा आणि परिक्षेच्या दिवशी होणारा मनस्ताप वेगळा. या गोंधळामुळ महाराष्ट्राचा टक्का घसरण्याची भीती व्यक्त होत आहे.
20 हजार लोकसंख्येचं औराद शहजानी महाराष्ट्रातलं शेवटचं गाव आहे. इथून नीटच्या परीक्षेसाठीचं औरंगाबाद केंद्र गाठण्यासाठी 80 किलोमीटरचा प्रवास करुन आधी लातूर, लातूरहून 280 किलोमीटरचा प्रवास करत औरंगाबादला जायचंय. बसने प्रवास केला तर परीक्षार्थ्याला जाऊन- येऊन हजार रुपये लागतील. परीक्षार्थ्यासोबत पालक औरंगाबादला गेले तरे दहा हजार रुपये खर्च येईल.
महाराष्ट्रातून यावर्षी 2 लाख 74 हजार विद्यार्थी नीटची परिक्षा देणार आहेत. एवढ्या विद्यार्थ्यासाठी नागपूर, नाशिक, ठाणे, मुंबई, पुणे आणि औरंगाबाद अशी सहाच केंद्र मंजूर आहेत. परिक्षा 7 मे रोजी सकाळी 10 ते 1 या वेळेत होईल. म्हणजे या केंद्रावर आदल्या दिवशी मुक्कामी जावेच लागेल. लॉजवाल्यांची चांदी. ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही ते विद्यार्थी रेल्वे स्टेशन, बस स्टॉपवर झोपलेली दिसू शकतात. आधीच नीटचं टेंशन त्यात परीक्षा केंद्र गाठण्याचा अतिरिक्त बोनस आहे.
वैद्यकीय प्रवेशासाठी 2017 पासून नीट अनिवार्य झाली. सर्वोच्च न्यायालयानं तसा निकाल गतवर्षी दिली. तेव्हापासून नीटच्या परिक्षा आयोजनाची नीट तयारी केली असती तर जिल्हानिहाय परिक्षा केंद्र देता येणं शक्य होतं. पण ना शिक्षणमंत्री विनोद तावडेंना याचं गांभीर्य वाटलं, ना केंद्राच्या शिक्षण मंत्र्यांना याची कोणी जाण करून दिली.
नीटसाठी 21 जानेवारीपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली. 1 मार्च शेवटची तारीख आहे. परंतु परीक्षा केंद्राच्या घोळामुळं अजूनही काही परिक्षार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरलेले नाहीत.
केंद्रीय पध्दतीनं यापूर्वी 2013 साली वैद्यकीय प्रवेश परिक्षा झाली होती.त्यात महाराष्ट्राचा उत्तीर्ण टक्का 6 टक्क्यापर्यंत घसरला होता. दाक्षिणात्या राज्यांनी निकालात आघाडी घेतली होती. नीटची परिक्षा 11 वी आणि 12 वीच्या संयुक्त अभ्यासक्रमावर अधारीत 180 प्रश्नांची होणार आहे. त्याचा तणाव विद्यार्थ्यावर असताना, परीक्षा केंद्राचं नियोजन बाबा आदमच्या जमाण्यासारखं का करण्यात आलंय, असा प्रश्न पालक शिक्षणमंत्र्यांना विचारत आहेत.