पुणेमहापालिकेच्या मतमोजणीनंतर पुण्यात आज पुन्हा एकदा वाडेश्वर कट्टा भरला. मतमोजणीच्या आदल्या दिवशी भरलेल्या कट्ट्यात खासदार संजय काकडे यांनी भाजपच्याच नव्हे तर इतर पक्षांच्या जागांबाबत अंदाज वर्तवला होता. तो अंदाज तंतोतंत खरा ठरला.


त्यासाठी वाडेश्वर कट्ट्यातर्फे संजय काकडे यांना चार हजारांचे बक्षीस देण्यात आलं.

पुण्यातील वाडेश्वर कट्टा हा विविध क्षेत्रांतील व्यक्तींना एकत्र करण्यासाठी ओळखला जातो. महापालिका मतमोजणीच्या आदल्या दिवशी या कट्ट्यावर सर्वपक्षीय नेते गप्पांसाठी जमले होते. यावेळी या नेत्यांनी आणि पुण्यातील काही पत्रकारांनीही कोणत्या पक्षाच्या किती जागा निवडून येतील याबाबत अंदाज वर्तवला होता.

ज्या कोणाचा अंदाज बरोबर येईल त्याला वाडेश्वर कट्ट्यातर्फे चार हजार रुपयांच बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. आज वाडेश्वर कट्टयावर हे नेते  पुन्हा भेटले आणि आश्चर्याची बाब म्हणजे खासदार संजय काकडे यांचा फक्त भाजपच नाही तर इतर पक्षांबाबतचा अंदाजही जवळपास तंतोतंत खरा ठरला.

खासदार काकडेंना त्यासाठी वाडेश्वर कट्टयातर्फे चार हजार रुपयांचं बक्षीसही देण्यात आलं. परंतु संजय काकडे यांचाच अंदाज एवढा तंतोतंत कसा जुळला, त्यापाठीमागचं गूढ काय? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकूश काकडेंनी उपस्थित केला.