Sangli News Update : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांचे पूत्र प्रतीक पाटील (Prateek Patil) यांची राजकारणात एन्ट्री झालीय. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथील राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे (Rajarambapu Cooperative Sugar Factory ) संचालक म्हणून प्रतीक पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. जयंत पाटील यांच्याच पावलावर पाऊल ठेवत प्रतीक पाटील यांच्या राजकीय जीवनाचा श्रीगणेशा कारखान्याचे संचालक होऊन झालाय. जयंत पाटील यांनीही 1984 साली आपल्या राजकीय जीवनाची सुरूवात कारखान्याच्या संचालक पदाची जबाबदारी हाती घेत केली होती. राजारामबापू पाटील यांच्या घराण्यातील तिसऱ्या पिढीचे यानिमित्ताने राजकारणात प्रवेश केलाय.
नव्या पिढीकडे सत्तेची सूत्रे सोपवताना जयंत पाटील यांनी तब्बल 37 वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीनंतर संचालक मंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. लोकनेते राजारामबापू पाटील हे वाळवा सहकारी साखर कारखाना स्थापनेच्या वेळी संचालक होते. राजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर वाळवा सहकारी साखर कारखान्याचे नामांतर राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना झाले. जयंत पाटील यांचा राजकीय प्रवेश हा राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून झाला. 10 वर्षे ते अध्यक्ष राहीले. तसेच आजपर्यंत संचालक होते. परंतु, यंदा प्रतीक पाटील कारखान्याच्या निवडणुकीत उतरल्याने जयंत पाटील यांनी ही निवडणूक लढवली नाही.
मागील दोन ते तीन वर्षांपासून जयंत पाटील यांच्या पाठोपाठ प्रतीक पाटील यांनी देखील इस्लामपूर मतदारसंघ आणि राजारामबापू उद्योग समूहात लक्ष घालायला सुरुवात केली होती. राजारामबापूंच्या निधनानंतर जयंत पाटील यांनी तरुण वयातच कारखान्याचे अध्यक्षपद स्वीकारले होते. त्यानंतर त्यांनी कारखाना आणि राज्यातील राजकारणात लक्ष घालत राजकारणातील आणि कारखान्याची जबाबदारी काही विश्वासू सहकाऱ्यांच्या जोरावर लिलया पेलत होते. आता जयंत पाटील यांचे राज्याच्या राजकारणातील वाढलेले महत्त्व आणि जबाबदाऱ्या पाहून इस्लामपूर मतदारसंघातील आणि राजारामबापू कारखान्यातील निर्णय घेण्यासाठी प्रतीक पाटील यांच्या हाती उद्योग समूहाची जबाबदारी देण्यात येईल, अशी शक्यता काही दिवसापासून वर्तवण्यात येत होती.
राजारामबापूंच्या घराण्यातील तिसरी पिढी राजकारणात
वाळवा तालुक्यातील कासेगावचे पाटील घराणे स्वातंत्र्य चळवळीतील महत्वाचे घराणे म्हणून ओळखले जाते. राजारामबापूंचे वडील अनंत पाटील आणि चुलते ज्ञानू बुवा यांनी प्रत्यक्ष स्वातंत्र्यचळवळीत सहभाग घेतला होता. हाच आदर्श समोर ठेवत राजाराम बापूंनीही स्वातंत्र्यचळवळीत सहभाग घेतला होता. कासेगावचे पहिले वकिल होण्याचे त्यांनी स्वप्न पूर्ण करत असतानाच शिक्षणाची गंगा दारोदारी पोहचविण्यासाठी कासेगाव शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गावपातळीवर त्यांनी शाळा सुरू केल्या. यातूनच त्यांना जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. हा घराण्याचा वारसा समर्थपणे पार पाडण्याची जबाबदारी अवघ्या 21 व्या वर्षी जयंत पाटील यांच्यावर आली. त्यांनीही ती समर्थपणे पार पाडत राजारामबापू उद्योग समूहाचा विस्तार केला. आता या घराण्यातील तिसरी पिढी प्रतिक पाटील यांच्या रूपाने सार्वजनिक जीवनात येत आहे. कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम लागल्यानंतर प्रतिक पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. कारखान्यावर युवा नेतृत्व म्हणून प्रतीक पाटील यांना संधी द्यावी अशी आग्रही मागणी काही कार्यकर्त्यांनी केली होती. अखेर प्रतीक पाटील यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली आणि कार्यकर्त्यांची अपेक्षापूर्ती झाली.
संचालक मंडळ
उपाध्यक्ष विजय पाटील यांच्यासह प्रदीपकुमार पाटील, देवराज पाटील, बाळासाहेब पवार, कार्तिक पाटील, विठ्ठल पाटील, दादासाहेब मोरे आणि मेघा मधुकर पाटील या आठ जुन्या संचालकांना पुन्हा संधी मिळाली आहे. तर नव्या चेहऱ्यात प्रतीक पाटील, दीपक पाटील, शैलेश पाटील, अतुल पाटील, अमरसिंह साळुंखे, बबन थोटे, रघुनाथ जाधव, योजना सचिन पाटील, आप्पासाहेब हाके, हणमंत माळी आणि राजकुमार कांबळे यांचा समावेश आहे.