सांगली: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटलांच्या एका वक्तव्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा केली जात आहे. एका स्थानिक वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्री व्हायची इच्छा व्यक्त केली. पण राजकीय संख्याबळ लक्षात घेता ते सध्या शक्य नसल्याचंही त्यांनी सांगितलंय.


जयंत पाटील म्हणाले की, "दीर्घकाळ राजकारणात काम करणाऱ्या कोणालाही राज्याचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल. त्यामुळे मलाही राज्याचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल. पण सध्याचं संख्याबळ लक्षात घेता ते आता शक्य नाही. आतापर्यंत राष्ट्रवादीच्या वाट्याला मुख्यमंत्रीपद आले नाही."





जयंत पाटील पुढे म्हणाले की, "राष्ट्रवादी पक्षाचा मुख्यमंत्री करायचा असेल तर अजून पक्ष वाढवण्याची गरज आहे. सध्या आमच्या पक्षाच्या आमदारांची संख्या केवळ 54 आहे. त्यामुळे पक्षाच्या आमदारांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. भविष्यात असे झाले तर पवार साहेब जो काही निर्णय घेतील त्यावर मुख्यमंत्रीपद कोणाला द्यायचं हे अंतिम असेल आणि तो आम्हाला मान्य असेल. मलाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटते, ते स्वाभाविक आहे."


Gram Panchayat Election Results | जयंत पाटलांच्या सासरवाडीत सत्तांतर; म्हैसाळ ग्रामपंचायतीवर भाजपची एकहाती सत्ता


जयंत पाटील म्हणाले की, "मला जसे मुख्यमंत्री व्हावेसे वाटते तसे माझ्या मतदारांनाही मी मुख्यमंत्री व्हावे असे वाटते. त्यात काही चुकीचं आहे असंही नाही. कारण मी शेवटी माझ्या मतदारांना जबाबदार आहे."


सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकच आहेत
तसेच मला मंत्रीपदापेक्षा राष्ट्रावादी काँगेसचे प्रदेशाध्यक्ष पद जास्त भावते अशी भावना जयंत पाटलांनी व्यक्त केली. सुप्रिया सुळे किंवा अजित पवार या दोघांपैकी एकाला पाठींबा देण्याची वेळ आल्यास कोणाला पाठींबा देणार या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले की, "मुळात सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांना वेगवेगळं समजणं चुकीचं ठरेल. ते एकाच घरातील आहेत."


पक्षाला उभारी देण्यात वाटा
भाजपची सत्ता असताना राष्ट्रवादीचे एकेक शिलेदारांनी पक्षाला रामराम करुन भाजपमध्ये प्रवेश केला. अशावेळी जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सांभाळले. पक्षाच्या पडतीच्या काळात अध्यक्ष शरद पवारांच्या साथीने जयंत पाटलांनी पक्षाला नव्याने उभारी दिली. त्यांनी राष्ट्रवादी काँगेसची सत्ता असताना अनेक महत्वाची पदे भूषवली आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या खास मर्जीतले असल्याचं समजलं जातं.


Gram Panchayat Election Results : अजित पवारांचा विजयी उमेदवारांना मोलाचा सल्ला, म्हणाले... जय-पराजय विसरुन ग्रामविकासासाठी एकत्र या


राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून आतापर्यंत ज्या-ज्या वेळी सत्ता आली त्या-त्या वेळी पक्षाला उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं आहे. राष्ट्रवादी पक्षात आतापर्यंत हे पद छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते पाटील, आर आर पाटील, अजित पवार यांनी भूषवले आहे. अजित पवार यांना दोन वेळा हे पद भूषवण्याची संधी मिळाली आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पारड्यात उपमुख्यमंत्रीपद पडणार हे निश्चित झाल्यानंतर अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात या पदावरुन रस्सीखेच सुरु होती. यात शेवटी अजित पवारांनी बाजी मारली.


2004 सालच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादीच्या आघाडीला बहुमत मिळालं. या निवडणुकीत काँग्रेसला 69 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेसला 71 जागा मिळाल्या. काँग्रेसपेक्षा आमच्याकडे जागा जास्त आहेत त्यामुळे मुख्यमंत्रिपद आम्हाला मिळावे अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली होती. पण त्यावेळी काँग्रेसच्या विलासराव देशमुखांनी बाजी मारत मुख्यमंत्रीपद मिळवलं होतं.


राष्ट्रवादी पक्षाने आतापर्यंत मुख्यमंत्रीपदाचा दावा जास्त ताणलेला नाही. या उलट जास्तीत जास्त महत्वाची खाती आपल्या पदरात पाडून घेणे हेच पक्षाचं धोरण राहिलंय.


कोणीही आरोप केले म्हणून राजीनामा घेणार नाही : जयंत पाटील


पहा व्हिडीओ: Jayant Patil | मलाही मुख्यमंत्री व्हावं असं वाटणारच; मंत्री जयंत पाटील यांचं मोठं वक्तव्य