नांदेड : नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील नायगाव धरण गावात देशी दारुच्या दुकानामुळे गावात मद्यापींचा त्रास वाढला आहे. नायगाव धरण गावातील दुकानामुळे पुरुषवर्ग दारुच्या अधीन गेला होताच, परंतु आता याचा आणखीही विपरीत परिणाम झाला आहे. कारण अगदी चौथीच्या वर्गात शिकणारे विद्यार्थीही दारु पिऊन गावात धिंगाणा घालत आहेत. या घटनांमुळे त्रस्त झालेल्या महिलांनी नायगाव धरण इथलं देशी दारुचं दुकान बंद करण्याची मागणी करत धर्माबादच्या तहसील कार्यालायासमोर ठिय्या मांडला.


नायगाव धरण गावातील या दारु दुकानामुळे सुरुवातीला पुरुषवर्ग मद्यपी आणि व्यसनाधीन झाला. परंतु आता चौथीच्या वर्गात शिकणारे मुले दहा-दहा रुपये जमवून एकत्र येत दिवसाढवळ्या दारु पीत असल्याचे चित्र आहे.



धर्माबाद तालुक्यातील नायगाव धरण हे गाव तेलंगाणा राज्यालगत आहे. या गावात तेलंगणापेक्षा दारु स्वस्त मिळते. त्यामुळे या गावात तेलंगणातील लोकांची सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत ये-जा राजरोस सुरु असते. शिवाय गावातील बहुतांश पुरुष मंडळी मद्यपी बनले. आता त्यात चौथीच्या वर्गात शिकणारी कोवळी मुलेही दारुच्या आहारी गेल्याचं चित्र आहे. गावातील महिला शेतकामासाठी घराबाहेर गेल्यानंतर ही मुले दारु पिऊन गावभर धिंगाणा घालतात. त्यामुळे या बायबापड्यानी गावातील हे देशी दारु दुकान बंद व्हावे आणि आमची पुढची पिढी वाचावी ही मागणी घेऊन धर्माबाद तहसील कार्यालया समोर ठिय्या दिला.


गावातील महिलांच्या प्रतिक्रिया
रेखा गडामोड
"लॉकडाऊनमुळे घरी असल्यामुळे आमची लहान मुले दररोज पार्टी करतात. आम्ही शेताच्या कामाबासाठी घराबाहेर गेल्यावर ही मुलं दहा-दहा रुपये जमा करुन बॉटल विकत घेतात आणि दारु प्यायला बसतात. घरी आल्यावर आम्हाला लेकरं, नवरा सगळ्यांचाच त्रास आहे," असं रेखा गडामोड या महिलेने सांगितलं.

देऊबाई कदम
"देशी दारु बंद करण्याच्या मागणीसाठी धर्माबादच्या तहसील कार्यालयात आलेले आहोत. देशी दारुमुळे आम्हाला खूप त्रास होत आहे. आमचे नवरे दारु पितातच आता लहान लेकरंही दारु प्यायला लागली आहेत. शिवाय दारु पिऊन घरातील महिलांना मारहाण देखील करतात," असं या गावातील देऊबाई कदम म्हणाल्या.

"स्त्रियांना खूप त्रास होत आहे. शाळा बंद असल्यामुळे लेकरं दारु पिऊन धिंगाणा घालत आहेत. नवरे पत्नीला सोडायला तयार आहेत, पण देशी दारु सोडायला तयार नाहीत," अशी प्रतिक्रिया गावातील आणखी एका महिलेने दिली.