सांगली : सांगली जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेल्या म्हैसाळ ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना दणका बसला आहे. जयंत पाटील यांचे मेव्हणे असणाऱ्या मनोज शिंदे-म्हैसाळकर यांच्या पॅनलचा दारुण पराभव झाला आहे. भाजपा गटाने याठिकाणी एक हाती सत्ता मिळवली आहे.


सांगली जिल्ह्यातल्या 152 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये जिल्ह्यात सगळ्यात लक्षवेधी निवडणूक ठरली ती मिरज तालुक्यातील म्हैसाळ ग्रामपंचायत. कारण ही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची सासुरवाडी आहे. म्हैसाळ येथे जयंत पाटलांचे मेहुणे व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका नेते मनोज शिंदे-म्हैसाळकर यांच्या पॅनलची गेल्या दहा वर्षापासून सत्ता आहे.


भाजपाचे जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे-म्हैसाळकर गट विरुद्ध राष्ट्रवादीचे मनोज शिंदे म्हैसाळकर यांच्या पॅनलमध्ये अत्यंत चुरशीने निवडणूक पार पडली. गेल्या पाच वर्षांपासून या ठिकाणी जयंत पाटील यांची मेहुणी असणाऱ्या मनोरमादेवी शिंदे या सरपंच म्हणून काम पाहत होत्या. या निवडणुकीमध्ये पुन्हा मनोरमादेवी शिंदे-म्हैसाळकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील 6 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. ज्यामध्ये सरपंच मनोरमादेवी शिंदे यांची मुलगी, दिर व अन्य कुटुंबातील सदस्य मैदानात होते. राष्ट्रवादी गटाच्या पॅनलच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांची जाहीर सभा पार पडली होती.


मात्र या निवडणुकीत मंत्री जयंत पाटील यांचे मेव्हणे मनोज शिंदे म्हैसाळकर यांच्या पॅनलचा धुव्वा उडाला आहे. 17 पैकी 15 जागांवर भाजपा गटाच्या दीपक शिंदे-म्हैसाळकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने विजय मिळवलेला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाला केवळ दोनच जागा या निवडणुकीत मिळाल्या आहेत. विद्यमान सरपंचांसह शिंदे-म्हैसाळकर कुटुंबातील 6 जणांचा पराभव झाला आहे.

संबंधित बातम्या