मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनजंय मुंडे आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नेते वेगवेगळ्या कारणामुळे सध्या अडचणीत सापडले असून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पण कोणीही आरोप केले म्हणून राजीनामा घेणार नाही, असं जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.


धनंजय मुंडे यांच्यावर एक महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. तर नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने अटक केली आहे. त्यामुळे विरोधक या दोन्ही प्रकरणात आक्रमक झाले असून दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत


...तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा प्रश्न उद्भवत नाही : जयंत पाटील
या गोष्टींचा आढावा पक्षांतर्गत जरुर घेतला जाईल आणि आवश्यकता भासली तर मुख्यमंत्र्यांशीही याबाबतीत चर्चा करु. तथ्याच्या आधारावर योग्य ती भूमिका घेऊ. कोणीतरी आरोप केले म्हणून राजीनामा घेणार नाही. पण याबाबतीत आम्ही पक्षस्तरावर योग्य तो विचार करणार आहोत. महिला आरोप करते, धनजंय मुंडेंनी आपली बाजू स्पष्ट केली आहे. असं असताना धनंजय मुंडेंना कोणीतरी जाणीवपूर्वक ब्लॅकमेल करत असेल आणि त्यात त्यांचा दोष नसेल तर राजीनामा घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.


नवाब मलिक यांच्याबाबत पाटील काय म्हणाले?
जावयाने गुन्हा गेला असेल तर चौकशी झाली पाहिजे. त्यांना कोणत्या बेसिसवर अटक करण्यात आली ही अद्याप माहिती नाही. या कामात सरकारी हस्तक्षेप झालेला नाही. नवाब मलिक यांचे जावई असूनही त्यांना अटक झालेली आहे. तपास यंत्रणा योग्य ते काम करेल. पण सरकारी हस्तक्षेप होण्याचा प्रश्न नाही. कोणाचे तरीही जावई आहेत म्हणून सासऱ्यांनी राजीनामा द्यावा असं मला वाटत नाही. जावयाची फॅमिली वेगळी आहे. त्याने जर गुन्हा केला असेल तर योग्य ती कारवाई होईल.


धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप
सामाजिक न्यायमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. संबंधित तरुणीने मुंडे यांच्याविरुद्ध ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहीत यावर स्पष्टीकरण दिलं आहे. धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर मुंडेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. धनंजय मुंडे यांनी स्वत: रेणू यांची बहीण करुणा यांच्याबरोबरच्या संबंधातून त्यांना दोन मुले झाल्याचा खुलासा केला आहे.


ड्रग्ज प्रकरणी नवाब मलिक यांचा जावई अटकेत
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना एनसीबीने अटक केली आहे. ड्रग्ज प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. एनसीबीने काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय ड्रग तस्कर करण सजनानीला अटक केली होती. त्याच्याकडून 200 किलो गांजाही एनसीबीने जप्त केला. करण सजनानीच्या चौकशीतून समीर खान यांचं नाव समोर आलं आहे. यासंदर्भात एनसीबीने समीर खान याची बुधवारी (13 जानेवारी) जवळपास दहा तास चौकशी केली आणि त्यानंतर त्यांना अटक केली.


संबंधित बातम्या


बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेचा आणि धनंजय मुंडेंचा जबाब मुंबई पोलीस नोंदवणार