Eknath Khadse On Devendra Fadnavis OBC Reservation : ओबीसी आरक्षणावरुन (OBC Reservation) सध्या राज्यात जोरदार घडामोडी घडत आहेत. यावरुन महाविकास आघाडी आणि भाजप नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. यात आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी उडी घेतली असून त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. खडसेंनी म्हटलं आहे की,  महाविकास आघाडी सरकारवर (Maha Vikas Aghadi) टीका करणाऱ्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांच्या काळात ओबीसी आरक्षण मिळू नये म्हणून जाणीवपूर्वक मराठा आणि ओबीसी या दोन समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केला. पाच वर्ष भाजपची सत्ता होती त्या काळात मुख्यमंत्री असताना तुम्ही काय केलं असा टोलाही यावेळी एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला. 


ओबीसींवरील अन्याय दूर करण्यासाठी पुढे या 
महा विकास आघाडी सरकारने या काळात विधानसभेत ओबीसी आरक्षणाबाबतचा कायदा केला असल्याची आठवण खडसे यांनी फडणवीस यांना करून दिली. भाजपची सत्ता असताना फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबत वेगळी भूमिका घेतली तर ओबीसी आरक्षणाबाबत वेगळी भूमिका घेवून या आरक्षण मिळू नये म्हणून समाजामध्ये भांडणं लावण्याचे काम केलं. जाणीवपूर्वक ओबीसी समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले असल्याची टीकाही यावेळी खडसेंनी केली. याच्या काळात काय झालं त्याच्या काळात काय झालं असं म्हणण्यापेक्षा आता ओबीसींवरील अन्याय दूर करण्यासाठी पुढे या असा सल्लाही यावेळी खडसे यांनी फडणवीस यांना दिला.


...मग भाजपने तो त्यावेळी का सोडवला नाही?


पाच वर्षे भाजपची सत्ता असतानाही ओबीसी आरक्षणाचा प्रश्न काय होता. मग भाजपने तो त्यावेळी का सोडवला नाही. त्यांच्याकडून झालं नाही आणि ते आता महाविकास आघाडी सरकारवर टीका करत आहेत असं म्हणत एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.


सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासंदर्भात निर्णय दिला आहे तो अत्यंत दुर्दैवी असून ओबीसी समाजावर अन्याय करणारा असाच आहे. मागच्या दरवाजाने ओबीसींच्या राजकीय आरक्षण घालवण्याचा हा एक प्रकारचा हा प्रयत्न नाही. ओबीसी संदर्भात महाविकास आघाडी सरकारने विधानसभेत कायदा केला होता मात्र तो टिकू शकला नाही अशी खंतही यावेळी खडसे यांनी व्यक्त केली. मात्र सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे ओबीसी समाजाचं  मोठं नुकसान होणार असल्याचेही ते म्हणाले.