सोलापूर : अभिनेत्री केतकी चितळे हिने केलेल्या वादग्रस्त पोस्टनंतर राजकीय स्तरावर विविध प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रसचे मंत्री, पदाधिकारी देखील मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले. सोलापुरात मात्र अशी आक्रमकता दाखवणं एका पदाधिकाऱ्यांला महागात पडलंय. राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विषयी टीका करणाऱ्याच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुहास कदम यांनी अजब आदेश काढले. मात्र त्यांनी काढलेले आदेश त्यांनाच महागात पडल्याचं चित्र आहे.


पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रसेचे सर्व जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, कॉलेज अध्यक्ष यांना सुहास कदम यांनी एक पत्र लिहलं. या पत्रात त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सूचना केल्या की येथून पुढे जो कोणी शरद पवार यांच्या विरोधात खालच्या शब्दात टीका करेल त्याला शोधा आणि तोडा. यासंदर्भात पत्रात त्यांनी लिहलं की, "आदरणीय पवार साहेब हा विचार आहे आणि त्याच विचाराला गालबोट लावण्याचा प्रयत्न समाज कंटाकाकडून होत आहे त्यामुळे हे सुधारण्याइतपत लायकीचे नाहीत, त्यामुळे यांना सरळ करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून, जो कुणी "पवार कुटुंबाबाबतीत खालच्या भाषेत वक्तव्य करत असेल तर त्याला शोधायचे आणि तिथेच तोडायचे" ही मोहीम आपणास आज पासून सुरु करायची आहे. तरी सर्व पदाधिकारी यांनी याबाबत आपल्या विभागात तात्काळ बैठक घेऊन सर्व पदाधिकारी यांना सूचना करावी”




यासंदर्भात एबीपी माझाशी बोलताना सुहास कदम यांनी हे पत्र लिहण्यामागची भूमिका देखील स्पष्ट केली. मागील काही दिवसांपासून शरद पवार यांच्या बद्दल विरोधी पक्षातील नेते, कार्यकर्ते, अभिनेते हे पातळी सोडून अंत्यत खालच्या शब्दात टीका करत आहेत. हे सहन करण्याच्या मर्यादे पलीकडील आहे. त्यामुळे मी या सूचना केल्या आहेत. या भूमिकेमुळे आमच्यावर किती ही गुन्हे दाखल झाले तरी चालतील मात्र आम्ही येथून पुढे शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर केलेली टीका सहन करणार नाही. अशी प्रतिक्रिया त्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.


 विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांकडून कारवाई, समर्थकांचा मात्र कारवाईला विरोध


सुहास कदम मात्र त्यांची ही आक्रमक भूमिका चांगलीच महागात पडली. त्यांची ही भूमिका पक्षाच्या ध्येय धोरणांच्या उलट आहे. त्यामुळे तुमचे पद हे स्थगित करण्यात येत आहे. पुढील खुलासा येईपर्यंत आपले पद स्थगित ठेवण्यात येईल असे पत्र राष्ट्रवादी विद्य़ार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यश सुनील गव्हाणे यांनी काढले आहे. मात्र स्थानिक कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर झालेल्या कारवाईचा विरोध होतोय. सुहास कदम हे राष्ट्रवादी काँग्रेसचे हाडाचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी पक्षवाढीसाठी मेहनत घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात झालेली ही कारवाई योग्य नाही अशा प्रकारचे मत सुहास कदम यांचे समर्थक फेसबुकवरुन व्यक्त करताना दिसत आहेत.



  शोधा आणि तोडा ही राष्ट्रवादीची संस्कृती नाही : खासदार सुप्रिया सुळे


सुहास कदम यांनी हे पत्र लिहल्यानंतर आज दुपारी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना या संदर्भात पत्रकारांनी विचारले असता त्यांनी देखील या भुमिकेला विरोध केला. "हे अतिशय चुकीचे आहे. ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संस्कृती नाही. पक्षाने असे कधी ही केलेले नाही. मी याची माहिती काढलेली आहे. संबंधित कार्यकर्ता पक्षात आहे की नाही हे तपासून त्याच्याविरोधात कारवाई केली जाईल." अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली होती.


संबंधित बातम्या :


Raj Thackeray : शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट; राज ठाकरेंनी केतकी चितळेला सुनावले, म्हणाले...


Ketaki Chitale : केतकी चितळेच्या अडचणीत वाढ, औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन