मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या कालच्या सभेनंतर लगेच आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची उत्तर सभा झाली. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये ही जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.  देवेंद्र फडणवीस या सभेतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या टीकेला आणि आरोपांना जोरदार उत्तर दिले आहे.   विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भाषणात उद्धव ठाकरे  यांच्यावर सडकून टीका केली. एकंदर  फडणवीसांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंना आणि महाविकासआघाडीला टार्गेट केलं.  त्यांच्या भाषणातील दहा मुद्द्यांची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. दरम्यान, या सभेत भाजपकडून हनुमान चालिसाचंह सामूहिक पठण होणार आहे. सभेला येणाऱ्या प्रत्येकाला हनुमान चालिसाची पुस्तिका भेट दिली जाणार आहे. 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची कालची सभा म्हणजे लाफ्टर सभा 


 छत्रपती शिवाजी महाराजांनी वंदन करून फडणवीसांनी भाषण सुरू केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची कालची सभा  म्हणजे लाफ्टर सभा आहे.  आम्हाला भाषणात नवे मुद्दे येतील अशी आशा  होती परंतु शेवटपर्यंत लाफ्टर सभा होती. तेजस्वी ऐकायला मिळेल असा आम्हला काल वाटलं होतं, नवं काहीच ऐकायला मिळल नाही. कालची कौरवांची सभा झाली आज पांडवची सभा आहे


बाळासाहेबांच्या पुत्राच्या राज्यात हनुमान चालिसा पठण म्हणजे राजद्रोह 


बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाच्या राज्यात हनुमान चालीसा पठण करणे हा राजद्रोह आणि औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवणे हा राजशिष्टाचार आहे 


बाबरी पाडण्यासाठी मी गेलो होतो याचा अभिमान 


रामजन्मभूमी आंदोलनात तुम्ही नव्हता हे म्हणाले तर मिरची झोंबली. उद्धवजी 1992 साली नगरसेवक झाले. जुलैमध्ये वकील झालो आणि डिसेंबरला नगरसेवक वकील देवेंद्र फडणवीस बाबरी पाडायला गेले होते. याचा मला अभिमान आहे.  कोणीही शिवसैनिक तिथे आला नव्हता. लाठ्या, गोळ्या खाऊन येथे पोहचलो. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही. आम्ही संघर्ष केला. 


उद्धवजी तुमच्या सत्तेचा ढाचा मी पाडणार 


उद्धव ठाकरेंना माझ्यावर केवढा विश्वास आहे, म्हणाले  बाबरीवर पाय टाकला की पडेल म्हणे. खरचं आहे. आज माझे वजन 102 किलो आहे. बाबरीवेळी माझे वजन 128 किलो होते. माझ्या पाठीत खंजीर खुपसून  तुम्ही माझे वजन कमी करू शकणार नाही.  तुमच्या सत्तेच्या ढाच्याला पडल्याशिवाय शांत बसणार नाही


शरद पवारांसमोर नाक घासून तुम्ही सत्तेत


बाळासाहेब ठाकरे शरद पवारांना मैद्याचे पोते म्हणायचे पण त्याच पोत्यासमोर उद्धव ठाकरे नाक घासून सत्तेत आले आहेत. 


देशात सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकच वाघ 


वाघाचे फोटो काढले म्हणून वाघ होता येत नाही. बाळासाहेब ठाकरे वाघ होतेच पण सध्या या देशात सध्या एकच वाघ आहे ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. सीमेपार जाऊन दहशतवाद्यांना मारणारे नरेंद्र मोदी हेच खरे वाघ आहे  :


आमच्याशी संसार अन् लग्न केले दुसऱ्याशी संसार


तुमचं हिंदुत्व गदाधारी नाही गधादारी आहे. तुम्ही म्हणता लाथ मारली , लाथ गाढव मारते. तुम्ही आमच्याशी संसार केला. आमची संपत्ती घेऊन दुसऱ्यांशी लग्न केले. आमच्या नावावर मतं मागितली आणि म्हणे एकतर्फी प्रेम.  ऑफिशिअल डिव्होर्स  घेतला नाही. 


कालचे भाषण सोनिया गांधींना समर्पित


कालचे भाषण सोनिया गांधींना समर्पित आहे. जी भाषा  कॉंग्रेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात बोलते तीच भाषा  बोलते ती भाषा काल उद्धव ठाकरेंच्या मुखात होती.


मुंबई महाराष्ट्रातून नाही तर भ्रष्टाचारापासून वेगळी करणार


काही मुद्दे नसले, तर मुंबईला तोडण्याचा मुद्दा शिवसेना काढते. मुंबईला महाराष्ट्रापासून कोणाचा बापही वेगळी करू शकत नाही.  मुंबई आम्हाला महाराष्ट्रातून नाही तर भ्रष्टाचारापासून वेगळी करायची आहे.  मुंबई आणि महाराष्ट्राचा एकच बाप आहे आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.


सकाळचा शपथविधी यशस्वी झाला नाही याचा आनंद


सकाळचा शपथविधी केला पण तो यशस्वी झाला नाही याचा मला आनंद आहे. जर तो शपथविधी यशस्वी झाला असता तर माझ्या मंत्रीमंडळात एकही वाझे, मलिक देशमुख नसते. जर तशी वेळ आली असती तर आम्ही मंत्रिमंडळाला लाथ मारली असती. 


रावणाच्या लंकेचे लवकरच दहन होणार 


 हनुमान चालीसाची आता सुरूवात झाली आहे त्यामुळे लवकरच रावणाच्या लंकेचे दहन होणार आहे. कारण सर्व वानरसेना माझ्यासोबत आहे. या वर्षी मुंबई महानगरापालिकेवर भगवा फडकणार आहे पण भारतीय जनता पक्षाचा  फडकणार आहे