मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) राजकारणासोबतच आता क्रिकेटच्या (Cricket News) मैदानात उतरणार आहेत. रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या (Maharashtra Cricket Association) अध्यक्षपदी निवड झाली आहे. रोहित पवार यांच्यासोबतच उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांची उपाध्यक्षपदी निवड झालीय. पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर पार पडलेल्या कमिटीच्या बैठकीत या निवडी जाहीर करण्यात आल्या. रोहित पवार यांनी ट्विट करून आपल्या निवडीबद्दलची माहिती दिलीय. रोहित पवार यांच्या या निवडीमुळे क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा पवार पर्व सुरू झालंय.
Rohit Pawar : काय म्हटलं आहे रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये?
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यपदी निवडून दिल्याबद्दल सर्व सदस्य क्लबचं आणि अध्यक्षपदी निवडून दिल्याबद्दल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार. आदरणीय पवार साहेबांनी अनेक वर्षे खेळासाठी भरीव कामगिरी केली आहे. त्यांचं मार्गदर्शन, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा पाठिंबा, तसंच mca च्या अनेक मा. अध्यक्षांसह अन्य पदाधिकाऱ्यांचीही या निवडीसाठी मोलाची मदत झाली. उपाध्यक्षपदी निवड झालेले माझे सहकारी किरण सामंत, सचिव शुभेंद्र भांडारकर, खजिनदार संजय बजाज आणि सह सचिव संतोष बोबडे यांचंही अभिनंदन. माजी अध्यक्ष अजय शिर्के आणि रियाज बागवान यांचंही मोठं सहकार्य लाभलं.
क्रिकेट नेहमीच माझ्या आवडीचा खेळ राहीलाय. आता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून क्रिकेट खेळाडूंसाठी काम करण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्य आहे. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा सोबत आहेतच. सर्वांना सोबत घेऊन खेळाडूंना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न राहील, असे रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या