Devendra Fadnavis On Sharad Pawar: ज्यांच्या हाती सत्ता असते त्यांचे पाय जमिनीवर असायला हवेत असे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले होते. त्यांच्या याच वक्तव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उत्तर दिले आहेत. आमची जमीन आम्हाला माहित आहे, हवेत नेमकं कोण आहेत हे तपासावे लागेल असे प्रत्युत्तर फडणवीसांनी दिले आहेत. औरंगाबाद येथे आयोजित ॲडव्हांटेज महाराष्ट्र एक्सपोच्या कार्यक्रमासाठी आले असतांना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 


काय म्हणाले होते शरद पवार?


पत्रकार परिषदेत बोलतांना शरद पवार म्हणाले होते की, सत्ता असल्यावर जमिनीवर पाय ठेवून राह्यचं असते. पण अलीकडे ज्यांच्या हातात सरकार त्यांच्याकडून, याला जेलमध्ये घालेल, याचा जमीन रद्द करेल असे विधान करणे राजकीय नेत्यांचे काम नाही. काही लोकांनी टोकाला जाण्याची भूमिका घेतली असल्याचं शरद पवार म्हणाले होते. 


फडणवीसांचे उत्तर...


ज्यांच्या हाती सत्ता असते त्यांचे पाय जमिनीवर असायला हवेत अशी टीका करणाऱ्या शरद पवारांच्या टीकेला उत्तर देतांना फडणवीस म्हणाले की, आम्हाला आमची जमीन माहित आहे. आम्ही जमिनीवर चालणारे लोकं आहोत. जमिनीवरच्या लोकांशी आमचा संपर्क आहे. त्यामुळे मला असे वाटते की, नेमकं हवेत कोण आहे याची तपासणी त्यांनी करायला हवी, असे प्रत्युत्तर फडणवीस यांनी दिले. 


सीमा वादावर सरकार गंभीर...


दरम्यान यावेळी बोलतांना फडणवीस यांनी सीमावादावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. सीमावादाबाबत कुठलेही शंका असल्याचे कारण नाही. सीमावादाबाबत सरकार खूप गंभीर आहे. तर सीमावाद प्रकरणात आम्ही हरिष साळवे यांची नियुक्ती करण्याचा विचार करत असून, त्यांचाशी संपर्क साधला आहे. तेही देखील आपल्या बाजूने उभे राहतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आपली केस मजबूत असल्याचं फडणवीस म्हणाले. 


मोठ्याप्रमाणावर गुंतवणूकदार महाराष्ट्रात येतायत!


जगातील 40 टक्के उत्पादन चीन करत होता, मात्र जगाचा चीनवरील विश्वास आता संपला आहे. त्यामुळे जगभरातील गुंतवणूकदार चीनमधून बाहेर पडत आहे. अशावेळी चीनमधून बाहेर पडणाऱ्या गुंतवणूकदार यांना पचवण्याची क्षमता भारतात आहे. त्यामुळे आपण देखील तयार राहिले पाहिजे. तसेच नवीन सरकार आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्याप्रमाणावर गुंतवणूकदार महाराष्ट्रात येत आहेत. तर 6 महिन्यात वेगवेगळ्या बैठका घेऊन 90 हजार कोटींची गुंतवणूक आणली असल्याचा दावा देखील फडणवीस यांनी केला आहे.