मुंबई : राष्ट्रवादी आमदार अपत्रता प्रकरणावरील ( NCP MLA disqualification case) गुरुवार 4 जानेवारी रोजीची सुनावणी रद्द झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची तब्येत बिघडल्यामुळे ही सुनावणी रद्द झाल्याचं सांगण्यात आलंय. पण वेळेअभावी या सुनावणीचे वेळापत्रक आजच तयार होणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिलीये. त्यामुळे आज दिवसाअखेर सुनावणीचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. पण राष्ट्रवादी दोन्ही गटांच्या मान्यतेनंतरच वेळापत्रकानुसार सुनावणी अपेक्षित आहे. 


सध्या विधासभा अध्यक्षांच्या कोर्टात शिवसनेच्या आमदार अपत्रता प्रकरणावर सुनावणी सुरु आहे. त्यातच आता राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी लवकरच सुरु होईल. पण या सुनावणीला देखील सध्या ब्रेक लागण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जातंय. कारण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ही सुनावणी होणं अपेक्षित होतं. पण आता या सुनावणीचं वेळापत्रक आल्यानंतरच तारीख निश्चित होणार असल्याची माहिती देण्यात आलीये. त्यामुळे आता या प्रकरणावरील सुनावणीला कधी वेग येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 


हिवाळी अधिवेशनादरम्यान नोटिसा


हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेकडून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. आठ दिवसांमध्ये उत्तर सादर करण्याचे आदेश या नोटिसांमधून देण्यात आले होते. त्यानंतर  5 डिसेंबरला आमदारांना विधीमंडळाकडून आठ दिवसांत उत्तर सादर करण्यासाठी नोटीस पाठवण्यात आल्या होत्या. यावर आता अजित पवार गटाने उत्तरासाठी एक महिना अधिकचा कालावधी मागितला. शरद पवार गटाने (Sharad Pawar) मात्र आमदार अपात्रतेच्या नोटिसीला उत्तर सादर केले होते. त्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून ही सुनावणी सुरु होईल, असं सांगण्यात आलं होतं. पण अद्यापही या सुनावणीला सुरुवात झाली नाही. 


निवडणूक आयोगात सुनावणी सुरू


दुसरीकडे राष्ट्रवादी कोणाची, पक्षावर दावा कुणाचा यावर निवडणूक आयोगात सुनावणी सुरु आहे. अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगात भूमिका मांडण्यात आली आहे. अजित पवार आणि शरद पवार गटाचा एकमेकांवर बनावट शपथपत्रं सादर केल्याचा आरोप केला आहे. राष्ट्रवादी पक्षाची स्थापना शरद पवारांनी केली, मग त्यांच्याशिवाय पक्ष कसा काय असू शकतो असा सवाल शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी उपस्थित केला आहे. तर सुप्रिया सुळे यांच्या कार्याध्यक्षपदाची नियुक्ती चुकीची असल्याचा युक्तिवाद अजित पवार गटाकडून आतापर्यंत करण्यात आला आहे. 


हेही वाचा :


राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाला वेग; विधानसभा अध्यक्षांसमोर जानेवारी महिन्यात होणार सुनावणी