पिंपरी चिंचवड : आजची देशाची आणि राज्याची परिस्थिती आगळी-वेगळी आहे. गेल्या 54 वर्षांत मी अनेक सरकार पाहिली. राज्याच्या बाबतीत केंद्राची भूमिका सहानुभूतीची असायची, पण सध्याचे केंद्र सरकार राज्य सरकारला खासकरून विरोधकांची सत्ता असणाऱ्या ठिकाणी कोंडी केली जात आहे. यासाठी यंत्रणांचा गैरवापर केला जातोय, असे म्हणत शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. शरद पवार पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहेत त्यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
केंद्र सरकार सामान्य माणसाला महागाईच्या दरीत ढकलतंय
केंद्र सरकारला सामान्य लोकांविषयी आस्था नाही. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. केंद्र सरकार सामान्य माणसाला महागाईच्या दरीत ढकलतंय आजची देशाची आणि राज्याची परिस्थिती आगळी-वेगळी आहे. सामान्यांचे प्रश्न वाढत आहेत. पण केंद्राला याची आस्था नाही. प्रत्येक दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढतच आहेत हे असं कधी घडलं नव्हतं. केंद्र म्हणतं आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती वाढल्याने हे होतंय. पण काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती कमी झाल्या तरी केंद्राने आपल्या देशात किमती कमी केल्या नाहीत. इतर देशात मात्र किंमती कमी होतायेत. केंद्राने या दरवाढीतून उत्पन्न वाढविण्याचे स्रोत निर्माण केले आहे. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना सलग दहा दिवस पेट्रोल-डिझेल दरवाढ झाली तेव्हा भाजपने ओरड सुरू केली होती. पण आज मात्र ते गप्प आहेत.
सीबीआय, ईडी, आयकर, एनसीबीचा गैरवापर केला जातो
गेल्या 54 वर्षांत मी अनेक सरकार पाहिली. राज्याच्या बाबतीत केंद्राची भूमिका सहानुभूतीची असायची, पण सध्याचे केंद्र सरकार राज्य सरकारला खासकरून विरोधकांची सत्ता असणाऱ्या ठिकाणी कोंडी केली जात आबे. यासाठी यंत्रणांचा गैरवापर केला जातोय. कोणत्याही राज्यात सीबीआयला अॅक्शन घ्यायची असेल तर राज्याची परवानगी घ्यावी लागते. पण अलीकडे सत्तेचा गैरवापर करून सीबीआयद्वारे राज्याला अडचणीत आणण्याचे काम करतंय. यासाठी मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्तांनी काही 1,2 अथवा चार आरोप केले. हे एक मोठं उदाहरण आहे.
मलिकांनी केंद्राच्या भूमिकेविरोधात मतं मांडली म्हणून त्यांच्या जावयावर कारवाई
अंमली पदार्थाची एक यंत्रणा जी आजवर कोणाला माहिती नव्हती. नवाब मलिकांच्या नातेवाईकांसोबत काय घडतंय. त्यांच्यावर दबाव आणतायेत. ते केंद्रावर बोलतात, म्हणून त्यांच्यावर हल्ला करता येत नसल्याने त्यांच्या जावयाला अटक केली. नवाब मलिक यांच्या जावयाकडे गांजा सापडला म्हणून अटक केली होती. पण संबंधित तज्ञ मंडळींनी हा गांजा नसून एक वनस्पती आहे, असं सांगितलं. मग न्यायालयाने जामीन दिला. पण यामुळं तुरुंगात अडकून रहावं लागलं.
ड्रग्ज पार्टी प्रकरणातील पंचच गुन्हेगार निघाला
अंमली पदार्थ पथकाने दोन साक्षीदार आणले, त्यात एक गुन्हेगार असल्याचं समोर येतंय. नवाब मलिक यांच्या जावयाला अटक करताना एक पंच आणला. तो पंच गुन्हेगार असल्याचं समोर आलं. पण तेंव्हापासून तो गायब आहे. पुणे पोलिसांनी त्याच्यासाठी वॉरंट काढलं आहे. म्हणजे हे गुन्हेगारांना सोबत घेऊन कारवाई करतात. गुन्हेगारांना सोबत घेऊन कारवाई करायची आणि चांगल्या लोकांना अडकवायचं, हेच धोरण या यंत्रणेचे दिसते
माझ्या कुटुंबीयांच्या घरी आयकर विभागाने धाडी टाकल्या, काहीच मिळालं नाही
अजित पवारांच्या तीन भगिनींच्या घरी इनकम टॅक्स विभागाने छापे मारले. हे प्रकरण न्यायालयात जाणार असल्याने अधिकच बोलत नाही. पण यातून काही निष्पन्न होईल असं दिसत नाही. पण चौदा-पंधरा व्यक्तींच्या पथकाने छापा टाकला. आता मध्यम वर्गीयांच्या घरात पाच दिवस थांबले मग त्यांचा पाहुणचार कसा करायचा असा प्रश्न पडतोच. शेवटी यात अजित दादांचे नाव आहे का? त्यामुळं माझा आक्षेप हा आहे की चौकशी करा पण त्यानंतर काम संपताच निघून जावं ना, पाच दिवस पाहुणचार घेऊ नये. एखादा दिवस ठीक आहे. पण इतके दिवस थांबल्यावर पाहुण्यांना हाकलून द्यायला हवं. पण यात पाहुण्यांचा दोष नव्हता त्यांना हाताळणाऱ्यांची ही चूक आहे.