मुंबई : पालघर प्रकरणावरून राज्य सरकारवर होणाऱ्या टीकेला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल फेसबुक लाईव्हच्या माध्यामातून उत्तर दिलं. त्यावेळी बोलताना पालघर प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पालघरमध्ये घडलेल्या घटनेवर भाष्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सकाळी 11 वाजता फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, पालघरमध्ये घडलेली घटना आणि कोरोनाचा काहीही संबंध नाही. त्यामुळे पालघरच्या घटनेचं राजकारण करू नका, असं आवाहन पवार यांनी बोलताना केलं आहे.


पालघर प्रकरणी राज्य सरकारवर होणाऱ्या टीकेवर बोलताना शरद पवार म्हणाले की, 'पालघर प्रकरण आणि कोरोनाचा काहीही संबंध नाही. त्यामुळे पालघरच्या घटनेचं राजकारण करू नका. पालघरमध्ये जी घटना घडली त्याचा संबंध असेल त्यासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. या प्रकरणातील काही लोकांना अटक करण्यात आली आहे. घटना घडल्यानंतर अवघ्या काही तासांतच राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनानं याची दखल घेतली आहे. अशी प्रकरणं घडायला नकोत, हे कृत्य निषेधार्ह आहे.'


पाहा व्हिडीओ : पालघरच्या घटनेचं राजकारण करू नका : शरद पवार



शदर पवार बोलताना म्हणाले की, ' केंद्र सरकारच्या नियमांचं पालन करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. तरच आपण कोरोनावर मात करू शकू. देशातील कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्यामुळे नाईलाजास्तव लॉकडाऊन 3 आठवड्यांनी वाढवावा लागला आहे. 3 मेपर्यंत लॉकडाऊन असून अजून 12 दिवसांचा कालावधी आहे. या काळात जर आपण व्यवस्थित काळजी घेतली तर 3 मेनंतर परिस्थितीमध्ये बदल होऊ शकतो. तसेच लॉकडाऊनच्या नियमावलीत शिथीलता आणण्याचा निर्णय कदाचित घेतला जाईल याबाबत काहीच शंका नाही.' तसेच या संकटाच्या काळात काळजी घ्या आणि घराबाहेर पडू नका. असा सल्ला त्यांनी दिला आहे. तर मुंबई, ठाणे, पुण्यात नियमांची कठोर अंमलबजावणी करणं आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.


जगभरातील कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता देशातील परिस्थिती बरी असल्याचं शरद पवार यांनी बोलताना सांगितलं. याबाबत सविस्तर बोलताना ते म्हणाले की, 'अमेरिकेसारखा महसत्ता असणारा देशही कोरोनामुळे संकटात आहे. तिथे मृत्यू झालेल्यांचा आकडा 40 हजार पार पोहोचला आहे. इटली, फ्रान्स आणि स्पेनमध्येही परिस्थिती चिंताजनक आहे. पाश्चिमात्य देशांपेक्षा भारताची स्थिती बरी असली तरी काळजी घेणं आवश्यक आहे. जर जगभरातील काही देशांतील कोरोना बाधितांचा आकडा पाहिला तर तो एकट्या महाराष्ट्रातील रूग्णांच्या संख्येएवढा आहे. त्यामुळे आपल्याला पाश्चिमात्य देशांची तुलना करून चालणार नाही. महाराष्ट्रात वाढणारा आकडा थांबवायचा कसा यासाठी उपाययोजना कराव्या लागतील.' पुढे बोलताना ते म्हणाले की, 'महाराष्ट्राचा विचार करायचा झाल्यास मुंबई, पुणे, कल्याण-डोंबिवली, ठाणे या ठिकाणी कठोरपणे नियमांची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. आकडा आपण शून्यावर आणणारचं या आवाहनाला आपल्याला सामोरे जायचंय. त्यासाठी सोशल डिस्टन्सिंगच्या सुचना आपण पाळणं आवश्यक आहे. दोन लोकांमध्ये आवश्यक अंतर ठेवून आपण करोनाचा संसर्ग रोखू शकतो. लोकांनी आवश्यक काळजी घेतली तर काही ठिकाणी यातून शिथिलता शक्य आहे.' असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.


कोरोनाच्या संकटाशी दोन हात करणाऱ्या कोरोना योध्यांबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, 'कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर देशातील लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे. देशातील आणि राज्यातील कोरोना बाधितांचा वाढणारा आकडा हा चिंताजनक आहे. जे लोक कोरोनाशी सामना करण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्यासाठी लढत आहे त्यांच्यासाठी आत्मियता दाखवणं आवश्यक आहे. त्यांच्या कुटुंबीयांसोबत आपण आहोत हे आपण त्यांना पटवून दिलं पाहिजे. सर्वच यंत्रणा चांगलं काम करत आहेत. पोलीस, डॉक्टर्स, परिचारिका दिवसरात्र मेहनत करीत आहेत.' असंही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.