NCP : राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी 2019 मध्ये भर पावसात साताऱ्यात सभा घेतली. परंतु, या सभेमुळे भाजपला निमोनिया झाला आहे. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांचे मी पुन्हा येईनचे स्वप्न भंगले, असा हल्लाबोल करत राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या टिकेला प्रत्यूत्तर दिले आहे.  


2019 च्या निवडणुकीत शरद पवार यांच्या पावसातील भाषणावरून गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. "साताऱ्यात पावसात भिजून तुम्हाला 54 च्यावर जाता आलं नाही. ती संख्या कायम ठेवण्यासाठी वारंवार घाबरू नका, काळजी करू नका, असं सांगावं लागत आहे, अशी टीका पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे. गोपीचंद पडळकर यांच्या या टिकेला महेश तपासे यांनी उत्तर दिले आहे. 


महेश तपासे म्हणाले, "राज्यातील तरुणांनी शरद पवार यांना भरघोस पाठींबा दिला आहे. परंतु, भाजपच्या अनेक नेत्यांना याचं दुख: झालं आहे. याच दुख:तून भाजपचे नेते वारंवार शरद पवार यांच्यावर वेगवेगळे निमित्त शोधून टीका करत आहेत. मात्र, शरद पवार हे मजबूत राष्ट्रीय नेते असल्यामुळे त्यांच्यावर बोलून भाजपच्या नेत्यांना केवळ प्रसिद्धी मिळेल यापलीकडे काहीही होणार नाही. कारण संपूर्ण महाराष्ट्र शरद पवार यांच्या मागे खंबीरपणे उभा आहे. "


भर पावसात शरद पवारांची सभा! 
2019 मध्ये उदनराजे भोसले यांनी राष्ट्रवाची साथ सोडून भाजमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते श्रीनिवास पाटील यांना लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून उदयनराजे यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली. 18 ऑक्टोबर 2019 रोजी सायंकाळी सहा वाजता सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाहीर सभेचे आयोजन केले होते. सभेला सुरुवात होताच मोठा पाऊस सुरू झाला. परंतु, शरद पवार यांनी हातात माईक घेत डोक्यावर धरलेली छत्री बाजूला काढण्याची कार्यकर्त्याला सूचना केली आणि भर पावसात त्यांनी आपल्या भाषणाला सुरूवात केली. सातारकरांची नाळ ओळखून भिजतच उपस्थितांना त्यांनी अनेक शाब्दिक सल्ले दिले. या सभेने उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला होता.  


महत्वाच्या बातम्या