CCTV in Navi Mumbai : संपूर्ण नवी मुंबई शहरावर नजर ठेवण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेकडून 1800 सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात येणार आहेत. यासाठी महानगरपालिका प्रशासनाने 158 कोटींची निविदा काढली होती. मात्र टाटा समूहाची कंपनी असलेल्या 'टाटा अ‍ॅडव्हान्स सिस्टीम लिमिटेड'कडून (Tata Advanced Systems) 127 कोटींची निविदा दाखल करण्यात आली. त्यांच्या निविदेमुळे नवी मुंबईकारांचे 30 कोटी वाचले आहेत. शहरात सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरू झाले असून पुढील आठ महिन्यात काम पूर्णत्वास जाणार आहे. 


नवी मुंबईतील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, मुख्य चौक, सिग्नल, नागरी वसाहतीमधील रस्ते अशा सर्वच ठिकाणांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्याच बरोबर बस आगार, रेल्वे स्टेशन समोरील परिसर, रिक्षा स्टॅन्ड यांचा समावेश आहे. नवी मुंबई शहरात प्रवेश करण्यात येणाऱ्या ऐरोली-मुलुंड उड्डाणपूल, ठाणे-दिघा रोड, शिळफाटा जंक्शन, वाशी टोल नाका, बेलापूर किल्ले गावठाण व बेलपाडा अशा सर्वच प्रवेशद्वारांवर तसेच वाहतूक नियंत्रणासाठी कॅमेरे लावण्यात येणार आहेत. शहरासाठी महत्त्वाच्या असलेल्या ठिकाणांच्या प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या मार्गांवर हाय डेफिनेशन फिक्स व हायस्पीड कॅमेरे लावण्यात येणार आहेत. तसेच शहरात येणाऱ्या वाहनाबाबतची माहिती ठेवण्यासाठी स्वयंचलित पद्धतीने नंबर प्लेट वाचण्यासाठी एएनपीआर कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. शहरातील 43 ठिकाणी पॅनिक अलार्म व कॉलबॉक्सची सोय असणार आहे. शहरात कोणत्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसवायचे यासाठी पोलिसांची मदत घेण्यात आली आहे. 


नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या मागणीनुसार देशविघातक व घातपात कृत्यांवर लक्ष ठेवण्यासाठी खाडी व समुद्रकिनारे अशा नऊ ठिकाणी थर्मल कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. आठ ठिकाणी स्थानिक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत. तसेच नवी मुंबई महापालिका मुख्यालय केंद्रीय नियंत्रण कक्ष पोलीस आयुक्तालय यांच्याशी जोडण्यात येणार आहे. तसेच या कामाचे डेटा सेंटर पोलीस मुख्यालय असणार आहे. तसेच ते पालिकेकडेही स्थापित करण्यात येणार आहे.


सिग्नल तोडणाऱ्या वाहनचालकांवर नजर ठेवण्यासाठी 96 कॅमेरे असणार आहेत. त्यामुळे नागरिकांनाही वाहतूक नियमांच्या शिस्तीचे पालन करावे लागणार आहेत. निविदा मिळालेली टाटा अ‍ॅडव्हान्स सिस्टीम लिमिटेड कंपनीकडून बसवण्यात आलेल्या कॅमेराची पुढील पाच वर्ष देखभाल दुरूस्ती करणार आहेत. नवी मुंबईत सध्या 282 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आले आहेत. मात्र यावर मर्यादा आली असल्याने अजून 1800 कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


असे असणार सीसीटीव्ही कॅमेरे


हाय डेफिनेशन कॅमेरे- 954
पीटीझेड कॅमेरे- 165 
वाहनांची गती देखरेख  कॅमेरे- 96
पॅनिक अलार्म व कॉल बॉक्स सुविधा- 43 ठिकाणे
खाडी व समुद्रकिनारे देखरेख थर्मल कॅमेरे- 9
सार्वजनिक घोषणा ठिकाणे- 126