Jayant Patil in Majha Maharashtra Majha Vision : एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन' कार्यक्रमात बोलताना  जयंत पाटील (NCP Jayant Patil) यांनी आपलं व्हिजन स्पष्ट केलं. यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर (BJP) टीकास्त्रही सोडलं. त्याशिवाय महाविकास आघाडीबाबत स्पष्टच शब्दात सांगितलं. आताचे सर्व सरप्राइज संपले आहेत. आता 2024 ला सरप्राइज देऊ, असे देवंद्र फडणवीस म्हणाले होते. 2024 च्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा प्लॅन काय असेल, याबाबत विचारलं असता जयंत पाटील म्हणाले की, लोकसभा आणि विधानसभा एकत्रच होईल, असा अंदाज आहे. त्यामुळेच आम्ही कामाला लागलो आहोत. 2024  ला महाविकास आघाडी सत्तेत येईल, हेच देवेंद्र फडणवीस यांना सरप्राइज असेल, असा विश्वास यावेळी जयंत पाटील म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP Jayant Patil) यांची  एबीपी माझाच्या "माझा महाराष्ट्र माझा व्हिजन" (Majha Maharashtra Majha Vision)  या कार्यक्रमात अभिजित कारंडे यांनी मुलाखत घेतली. 2024 मध्ये महाविकास आघाडी सत्तेत येईल आणि महाविकास आघाडीचे नेते मुख्यमंत्री ठरवतील, असे जयंत पाटील यांनी सांगितलं. वंचितसोबतच्या युतीबाबत विचारलं असता, जयंत पाटील म्हणाले की भाजपसोबत लढा देण्यासाठी मित्रपक्ष वाढवणं गरजेचं आहे. 


उद्धव यांना सोडून गेलेल्यांपैकी 40 पैकी सहा आमदार निवडून येतील


भाजपनं राष्ट्रवादीचे मतदारसंघ टार्गेट केलेत, याला राष्ट्रवादी कसं सामोरे जाणार? या प्रश्नाचं उत्तर देताना जयंत पाटील म्हणाले की, भाजपनं लोकसभेसाठी मतदारसंघ लक्ष्य केले आहेत. केंद्रीय मंत्री त्या मतदारसंघाचे दौरे करत आहेत, याचं मतदाराला काय देणं घेणं नाही.  भाजपच्या मतदारसंघात महाविकास आघाडीचाच आमदार असेल. 2019 जसं सरप्राइज मिळालं, तसेच पुन्हा 2024 मध्ये मिळेल, असा विश्वास यावेळी जयंत पाटील यांनी व्यक्त केला. जे जे शिवसेनेला सोडून गेलेत, त्यांचा आतापर्यंत पराभव झाला आहे. आता जे 40 सोडून गेलेत, त्यातील सहा सात कसेबसे निवडून येतील, उरलेले सर्व पराभूत होतील, असे जयंत पाटील म्हणाले. उद्धव ठाकरेंबद्दल शिवसैनिकांमध्ये सहानभुती आहे.  मुख्यमंत्री महोदयांनी ठाण्यात धनुष्यबाण करायला टाकलाय, असं ऐकलं. पण सर्व काही घेऊन गेले तर उद्धव ठाकरे यांच्याकडे ठाकरेपणा तसाच राहणार आहे, असा टोला पाटील यांनी यावेळी लगावला. जिथे उद्धव ठाकरे उभे राहतील, तिथे शिवसेनेचा आमदार निवडून येईल, असे जयंत पाटील म्हणाले. शिवसेनेचा आमदार असलेल्या ठिकाणी जाऊन कधीही आमचाच आमदार येईल, असं म्हटले नाही, जिथे भाजपचा आमदार आहे, तिथे राष्ट्रवादीचा किंवा महाविकास आघाडीचा आमदार येईल, असं म्हणालो होते, असं जयंत पाटील यांनी आपल्यावरील आरोपाचं स्पष्टीकरण दिलं. 


आपण सर्वकाळ सत्ते असू, असे कुणी मानू नये. आपल्याला जे काम, जबाबदारी मिळाली, ते पूर्ण करावी..पुढच्यांनी नंतर करायची किंवा पुन्हा आम्ही येऊ, या कल्पनेनं काम करायचं, असे जयंत पाटील म्हणाले.  जे जाणारे असतात कधीच कुणाचे नसतात.. त्यामुळे त्यांच्या मागे लागायचं नसते. घाबरायचं नसते. कारण त्यांची किंमत तेवढीच असते. जे ठामपणाने राहतात, ते खरे आपले असतात. या सर्वांमध्ये जोपर्यंत आपल्यात नवीन माणसे निवडून आणायची ताकद आहे, तोपर्यंत घाबरायचं कारण नाही, असे जयंत पाटील म्हणाले.  


मुंबईप्रमाणे इतर राज्यात दळवळणाची साधने निर्माण झाली. प्रत्येक राज्याच्या राजधानीत आंतरराष्ट्रीय विमानतळं आणि बंदरे सुरु झाली. त्यामुळे महाराष्ट्रात आणि मुंबईत होणारा बिझनेस इतर राज्यातही गेले. त्यामुळे महाराष्ट्राला इतर राज्यांशी स्पर्धा करण्याची वेळ आली आहे.  स्पर्धा करणारे महाराष्ट्र राज्य इतर राज्यांपेक्षा पुढे असले पाहिजे. प्रशासकीयदृष्ट्या आणि सुविधांच्या दृष्टीनं पुढे असलं पाहिजे. त्यामुळे प्रत्येक पक्षातील नेत्यांनी याला प्रथम प्राधान्य द्यावे. पर्यटनात आपण म्हणावं तितकं पुढे गेलेलो नाही. केंद्राच्या इशाऱ्यावर आपण महाराष्ट्राचं काम करत असेल तर अर्थात केंद्राचा अधिकार आहे. आपल्याला केंद्राच्या दृष्टीनं प्राधान्य मिळवणं, प्रत्येक मुख्यमंत्र्यांची ही जबाबदारी असेल. कर्नाटक, गुजरात असो अथवा केरळ असो या किनारपट्टी असणाऱ्या राज्यांच्या आपण कसे पुढे असणार याचा विचार व्हायला हवा, असे जयंत पाटील म्हणाले. राज्यातील प्रकल्पांना गती कशी देता येईल, विमानतळाची कामे कशी लवकर होतील. नागपूरसारख्या शहराचा विकास झपाट्यानं कसा होईल? विदर्भ आणि मराठवाड्याचा विकास आणि येथील लोकांचं दरडोई उत्पन्न कसं वाढेल, याबाबत व्हिजन राज्यातील नेत्यांनी तयार करायला हवं, असे जयंत पाटील म्हणाले. 


 


आणखी वाचा:
Ashok Chavan, Majha Maharashtra Majha Vision 2023: फडणवीसांच्या A, B, C प्लानवर अशोक चव्हाणांचं 'प्लान R'नं उत्तर; पाहा काय म्हणाले?