कोणाचीही जमीन बळजबरीने विकत घेतलेली नाही. अधिकाऱ्यांची जमीन खरेदी हा महसूल विभागाच्या अंतर्गत येणारा विषय आहे.
तरी एकही तक्रार दाखल नसतानाही मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिलेले आहे. मुख्यमंत्र्यांना लवकरात लवकर चौकशी करायला सांगू असंही शिंदे यांनी सांगितलं.
ज्यांच्यावर आरोप आहेत, ते स्वतः कशी चौकशी करतील, असा दावा करत याबाबत एसआयटी नेमण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार जयंत जाधव यांनी केली.
शेतकऱ्यांच्या जमिनींबाबत फक्त मोबदला देऊन हा प्रश्न सुटत नाही. शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे, नाहीतर राज्यावर मोठं संकट येईल. राज्य शासनाने विचार करून सर्व प्रश्नांची उत्तरं द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार हेमंत टकले यांनी केली.
चौकशी कोण अधिकारी करणार आहे? चौकशीचं स्वरुप काय? या जमिनी अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर आहेत, त्यामुळे चौकशी कोण करणार हे स्पष्ट करा अन्यथा 'कुंपणचं शेत खातंय' असं होईल, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी केली.
मुंबई ते नागपूर असा 710 किलोमीटरचा समृद्धी हायवे 2 टप्प्यात बांधण्यात येणार आहे. त्यालगत मेगासिटी, मोठे प्रोजेक्ट्स, हॉटेल्स असे उपक्रम येणार आहेत. त्यासाठीच बड्या अधिकाऱ्यांनी स्वतः आणि नातलगांच्या नावे याठिकाणच्या जमिनी खरेदी केल्याचा आरोप आहे.