नागपूर : राज्य सरकारने एमपीएससीमार्फत घेतल्या जाणाऱ्या पीएसआय पदाच्या परीक्षेसाठी खुल्या गटाची कमाल वयोमर्यादा 28 वरुन 31 तर आरक्षित गटाची 33 ते 34 पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे पीएसआय पदाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विदयार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

याच वर्षी एप्रिल महिन्यात कमाल वयोमर्यादा पाच वर्षांनी वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यामुळे 28 वर्ष वय असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. गेली अडीच वर्षे या पदाची जाहिरात आलेली नव्हती, पण सरकारने वयोमर्यादा वाढवणार असल्याचं जाहीर केल्यानंतर या विद्यार्थ्यांनी जोमाने तयारी सुरु केली होती.

काही दिवसापूर्वी पीएसआय पदासाठी निघालेल्या जाहिरातीमध्ये वयोमर्यादा 28 ठेवण्यात आली होती. जाहिरातीमधील कमाल वयोमर्यादा पासून अनेकांची स्वप्न भंगली. त्यामुळे सरकारने वाढीव वयोमर्यादा द्यावी अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला होता. मुख्यमंत्र्यांनी वयोमर्यादा वाढवल्याची घोषणा करुनही चुकीची जाहिरात काढली गेली.

याविरोधात हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच धनंजय मुंडे, सतीश चव्हाण आणि आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी औचित्याच्या मुद्द्यारे वयोमर्यादा वाढवण्यासाठी मागणी केली होती. त्यावेळी सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी पीएसआयची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा देऊ असे आश्वासन दिले होते.

चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत निवदेनाद्वारे वयाची अट वाढवली असल्याचे जाहीर केले आहे. तसंच मुख्यमंत्री या निर्णयावर राज्यपालांची सही घेतील आणि त्यानंतर लगेचच याचे नोटिफिकेशन सरकारतर्फे काढण्यात येईल.